नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या देशातील खेडीपाडी ही चालती बोलती विद्यापीठे आहेत. याठिकाणी दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत प्रश्न सोडविण्याचे काम सुरु असते. इथे कुठलीही गोष्ट लिखित नसते, इथे फक्त सुरु असते ते वेगवेगळे प्रयोग. त्यामुळे खेड्यातून जी व्यक्ती पुढे आलेली असते, त्या व्यक्तीला पराभूत होण्याची भीती कधीही नसते. असे उद्गार प्रख्यात शास्रज्ञ व थायरोकेअरचे संस्थापक डॉ. ए. वेलुमनी यांनी काढले. ते एसएमबीटी फेस्ट २०२४ च्या दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी एसएमबीटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे यांच्यासह अधिष्ठाता डॉ मीनल मोहगावकर, डॉ. अशोक पाटील, डॉ. किरण जगताप, प्राचार्य डॉ. प्रदीप भाबड, डॉ योगेश उशीर, डॉ. कविता मातेरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
डॉ. वेलुमनी यांनी उपस्थितांना संबोधित करत त्यांच्या खडतर आयुष्याचा प्रवास उलगडला. डॉ. वेलूमनी यांचा जन्म अतिशय हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबात झाला.अनेक अनेक अडचणी समोर होत्या मात्र, त्यांनी कधीही परिस्थितीमुळे शिक्षण थांबू दिले नाही. त्यांच्या आईने काबाडकष्ट करत सर्व भावंडांना उत्तम शिक्षण दिल्याचे डॉ. वेलुमनी अभिमानाने सांगतात.
ते म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर त्यांना नोकरी करायची होती. यावेळी त्यांनी तब्बल ५०पेक्षा अधिक ठिकाणी मुलाखती दिल्या. यादरम्यान त्यांच्याकडे अनुभव नसल्याने त्यांना नोकरी नाकारण्यात आली. याच वेळी त्यांनी निश्चय केला होता की, आता नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे आपण बनायचे आहे. यानंतर त्यांनी तामिळनाडू सोडून पुढील प्रवास मुंबईच्या दिशेने केला.
गणितात तज्ञ असलेल्या डॉ वेलूमनी यांनी काही दिवस भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर येथे नोकरीही केली. यानंतर जगावेगळ काही करण्याचे मनात असल्यामुळे त्यांनी व त्यांच्या पत्नीने एकाच दिवशी नोकरी सोडली, हा क्षण किती निर्णायक होता, किती मोठी हि रिस्क होती याबाबाबत ते आवर्जून सांगतात. नोकरी सोडल्यानंतर पत्नीची साथ कशी महत्वाची असते हेदेखील त्यांनी नमूद केले.
अनेक किलोग्राम असलेले शरीर सोडून मी केवळ शरीरातील १५ ग्रॅम असलेल्या थायरॉईड ग्रंथींवर काम करण्याचे ठरवले. एक गोष्ट निश्चित करून तीच फोकस करून खोलवर जाऊन अभ्यास करून त्यावर काम केले. यांनतर मुंबईत छोटेखानी १० बाय १० च्या खोलीत त्यांनी लॅब सुरु केली. आज या लॅबचा विस्तार केवळ महाराष्ट्र किंवा भारतात नाही तर जगातील दहा देशांत लॅब सुरु झाल्या आहेत.
थेट रुग्णाच्या घरात जाऊन थायरॉईडची तपासणी केल्या जात आहेत. सर्वात कमी दरांत या तपासण्या करून रुग्णसेवा करत असल्याचे डॉ. वेलुमनी सांगतात. विशेष म्हणजे, २५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना त्यांनी नोकरी दिली आहे. त्यांच्या कंपनीत नोकरी करण्यासाठी व्यक्ती खेड्यातील असली पाहिजे, इंग्रजी भाषा आलीच पाहिजे असे काहीही नाही. शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी असली पाहिजे असे नियम असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी, एसएमबीटी कॅम्पसमधील विविध महाविद्यालयांतील डीन, प्राचार्य व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
यानंतर त्यांनी फेस्टच्या नियोजित कार्यक्रमास हजेरी लावली. डॉ. वेलुमनी यांचा सन्मान एसएमबीटीच्या पॅथोलॉजी, मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे करण्यात आला. कुठलेही भाषणे नाही आलो आणि तात्काळ मुद्द्यावर बोलण्यास सांगितल्यामुळे डॉ. वेलूमनी यांनी एसएमबीटी व्यवस्थापनाचे कौतुक केले. याप्रसंगी डॉ. वेलुमनी यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
१२ वी फेलमुळे जिंकायला शिकलो
हलाखीच्या परिस्थितीतून अधिकारी पडला गवसणी घालता येते याबाबत विद्यार्थ्यांशी वार्तालाप करत विक्रांत मॅसी याने मने जिंकली. तो म्हणाला की, 12th फेल चित्रपट हे केवळ औचित्य होते इथून खऱ्या अर्थाने जिंकायला शिकलो. दिल्लीमध्ये हजारो मुलं युपीएससी करण्यासाठी येतात. आज चित्रपटामुळे या परिसरात चार मोफत लायब्ररी सुरु झाल्या आहेत. १२ वी फेल चित्रपटाच्या यशाचे गमक विक्रांतने याप्रसंगी सांगितले. विक्रांतच्या मालिकांमधील भूमिका आणि मिर्झापूरसारख्या गाजलेल्या भूमिकांबाबतदेखील विद्यार्थ्यांनी मनमोकळा संवाद साधला.
अन् अमाल भारावला…
प्रख्यात गायक अमाल मलिकच्या गाण्यांवर उपस्थित विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. नव्या-जुन्या गाण्यांसह अल्बम गाण्यांची भर पडल्याने विद्यार्थ्यांची संध्याकाळ मनमुराद आनंदात गेली. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि गायनाची साद यामुळे अमालदेखील भारावला. नाशिकमधील सर्वात चांगला कार्यक्रम असल्याचे याप्रसंगी अमाल मलिकने सांगितले.