नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सुरगाणा तालुक्यातील कुकूडणे येथे उतरविण्यात आलेला प्रतिबंधीत दारूसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागला असून या ठिकाणी मालाची वाहतूक करण्यासाठी आलेले तस्कर मात्र दुचाकी सोडून पसार झाले आहे. घटनास्थळावर विदेशी दारूसाठ्यासह निर्जनस्थळी उभ्या असलेल्या तीन दुचाकी असा सुमारे १० लाखाहून अधिक मुद्देमाल पथकांनी जप्त केला आहे. ही कारवाई कळवण, नाशिक व दिंडोरी भरारी पथकांनी केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर एक्साईज विभाग सतर्क झाला असून सोमवारी (दि.१८) मध्यरात्री कळवण व दिंडोरी भरारी पथके सिमाभागात पेट्रोलींग करीत असतांना हा साठा एक्साईज विभागाच्या हाती लागला. कुकूडणे शिवारातील दूध डेअरी मार्गावर हा साठा उतरविण्यात आला होता. गुजरात पासिंग असलेल्या मोटारसायकली दुध डेअरीच्या दिशेने काळोखात गेल्याने पथकास संशय आला. सावज हाती लागल्याचे लक्षात येताच अन्य पथकांना सतर्क करीत दबा धरला असता ही कारवाई करण्यात आली. दुचाकींचा पाठलाग करीत घटनास्थळावर पोहचलेल्या पथकाने छापा टाकला असता संशयितानी आपले वाहने सोडून तेथून पळ काढला. पथकाने अंधा-या रात्री जंगलात त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र संशयित हाती लागले नाही. घटनास्थळावरून राज्यात विक्रीस बंदी असलेला विदेशी दारूचा साठा व जीजे २६ एएफ ६४१९, जीजे २१ डीसी ६९६० व जीजे २१ डीसी १९०२ या तीन अॅक्टीव्हा असा सुमारे १० लाख चार हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
याप्रकरणी त्रीकराम मेजलाजी रेबारी उर्फ शिवा मारवाडी या फरार संशयिताविरोधात दारू बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास निरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहेत. ही कारवाई आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे,विभागीय उपआयुक्त उषा वर्मा,अधिक्षक शशिकांत गर्जे,उपअधिक्षक अ.सु.तांबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रकांत पाटील,दुय्यम निरीक्षक ए.बी.बनकर,रा.म.डमरे,एम.डी. कोंडे,ए.बी.पवार,आर.बी.जगताप सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.के.शिंदे जवान दिपक आव्हाड,गोकुळ शिंदे,विलास कुवर,गोरख गरूड,गणेश शेवगे,पोपट बहिरम,योगेश साळवे,दिपक नेमणार,केशव चौधरी आदींच्या पथकाने केली.