नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हिरावाडीतील कॅनलरोड भागात मित्रांचा वाद मिटवण्यात गेलेल्या २८ वर्षीय तरुणास सिमेंटचा पेवर ब्लॅाक डोक्यात मारल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी तात्काळ दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
अजय भिमा वळवे (२५ रा.ओंकारबाबाचाळ,फुलेनगर) व साहिल उर्फ सोनू सुभाष गोडे (२२ रा.फुलेनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, संदिप रघूनाथ अहिरे, कार्तिक समाधान गांगुर्डे, पियुष दिलीप जाधव, विक्की विनोद वाघ, जय संतोष खरात, प्रविण शार्दुल, विशाल चंद्रकांत भालेराव,अजय वळवी व त्याचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या उर्वरीत संशयितांची नावे आहेत. याबाबत अतुल पंढरीनाथ भोये (२४ रा.मौनगिरीनगर,हिरावाडी) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. या घटनेत देवेश कैलास अंबरपुरे (२८ रा.जोशीवाडा,हिरावाडी) हा युवक जखमी झाला आहे. रविवारी (दि.१७) रात्री कॅनलरोडवरील भिकुसा पेपर मिल भागात ही घटना घडली.
अतुल भोये व रोहत गांगुर्डे हे दोघे मित्र रविवारी गायत्रीनगर भागात राहणा-या बबलू पंजाबी या मित्रास त्याच्या घरी सोडून आपल्या घराकडे परतत असतांना ही हाणामारी झाली. भिकुसा पेपर मिल जवळ दोघे मित्र थांबलेले असतांना दुचाकीवरून जाणा-या तरूणांना त्यांनी आवाज दिल्याने हा वाद झाला. चेतन नावाचा मित्र असल्याचे समजून आवाज दिल्याने दुचाकीस्वार संदिप अहिरे, कार्तिक गांगुर्डे व पियूष जाधव या संशयितांनी थांबून दोघांना शिवीगाळ केली. याचवेळी पाठीमागून आलेल्या उर्वरीत दुचाकींवरील संशयितांनी वरिल तीन मित्रांना शिवीगाळ व दमदाटी करीत असल्याच्या संशयातून भोये व गांगुर्डे यांना मारहाण केली.
याबाबत दोघा मित्रांनी देवेश अंबरपुरे या मित्रास कळविल्याने तो आपल्या दोघा मित्रांच्या बचावासाठी धावून आला. संशयित टोळक्यास त्याने समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता एकाने जमिनीवर पडलेला पेवर ब्लॉक त्याच्या डोक्यात हाणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत अंबरपुरे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रायकर करीत आहेत.