इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. उध्दव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार म्हणून आमश्या पाडवी यांची ओळख होती. नंदूरबारमध्ये आदिवासींचा चेहरा म्हणून त्यांचा ठाकरे गटात उल्लेख केला जात होता. ठाकरे यांनी अनेक बड्या नेत्यांना बाजूला सारुन २०२२ मध्ये त्यांना विधान परिषदेवर निवडून दिले होते. पण, त्यांनीच आज शिंदे गटात जावून ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
ठाकरे गटाचे कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे हे शिंदे गटात
ठाकरे गटाचे कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कल्याण हा कायमच शिवसेनेचा अभेद्य गड राहिला आहे. याच कल्याण शहरात गेल्या काही वर्षात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे करून येथील शहरांमध्ये आमूलाग्र बदल केला. याच विकासकामांकडे बघून अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आवर्जून शिवसेनेमध्ये येत आहेत. त्यांच्या येण्याने हा शिवसेनेचा गड अधिक भक्कम होईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख अरुण आशान उपस्थित होते.