नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आडगाव ट्रक टर्मिनलचा प्रश्न मार्गी लागला आहे. नाशिक महानगरपालिका विकसित करत असलेल्या बस डेपोच्या शेजारच्या जागेत ट्रक टर्मिनला अतिरिक्त जागा उपलब्ध करून देत याठिकाणी ट्रक टर्मिनल विकसित करण्याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी मनपा आयुक्त अशोक करंजकर यांना आदेश दिले आहे. या निर्णयाबद्दल नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहे.
यावेळी मंत्री भारतीताई पवार, आमदार देवयानीताई फरांदे, आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुल ढिकले, भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, पदाधिकारी सुभाष जांगडा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या कामाबाबत चर्चा केली यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मनपा आयुक्त अशोक करंजकर यांना बस डेपोच्या जागेच्या शेजारच्या भूखंडावर ट्रक टर्मिनलसाठी अतिरिक्त जागा देऊन ते विकसित करून देण्यात तसेच शहरात बंद पडलेल्या जकात नाक्यांवर ट्रक टर्मिनल विकसित करण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी बस डेपोच्या कामात कुठलाही अडथळा न आणण्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार सोमवार दि.१८ मार्च २०२४ रोजी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यासाठी मनपा आयुक्तांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले आहे.