इंडिया दर्पण वृत्तसेवा
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी रविवारी दि. १५ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्तावर घटस्थापना उत्तम पर्वकाळ असणार आहे.
नवरात्र
हिंदू पंचांगानुसार, या वर्षीचा शारदीय नवरात्रौत्सव अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला अर्थात दि १४ ऑक्टोबरला रात्री ११:२४ वाजता सुरू होईल आणि प्रतिपदा तिथी १५ ऑक्टोबरला दुपारी १२:३२ वाजता संपेल. मात्र, उदय तिथीनुसार यंदा शारदीय नवरात्रौत्सवाला रविवार १५ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे.
१५ ऑक्टोबरला हा शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला जाणार आहे. नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी ही महत्वाची मानली जाते. नवरात्रीची ही अष्टमी यंदा २२ ऑक्टोबरला आणि नवमी २३ ऑक्टोबरला साजरी होणार आहे.
९ दिवस चालणारा हा नवरात्रौत्सव २४ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी समाप्त होणार आहे. २४ ऑक्टोबरला साडेतीन मुहूर्त पैकी एक पवित्र दसऱ्याचा सण आहे.