पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असतांना मनसेचे प्रदेश सरचिटणीस वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जातील याबाबत चर्चा रंगली आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाच्या नेत्याने ऑफर दिली आहे. तर इतरही पक्षांनी त्यांच्यासाठी फिल्डींग लावली आहे. पण, वसंत मोरे हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. याअगोदर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. पण, ती विकास कामांसाठी होती असे सांगून त्यांनी त्या चर्चेला विराम दिला होता.
पण, आता मनसेचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा ते शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा जास्त रंगली आहे. फायर ब्रँड नेता म्हणून ओळख असलेल्या वसंत मोरे यांचा प्रभाव असलेला भाग हा पुणे व बारामती लोकसभा मतदार संघात येतो. त्यामुळे ते शरद पवार गटात गेल्यास त्यांना फायदा होवू शकतो.
शरद पवार गटात काम करण्यास मोठी स्पेस असल्यामुळे ते शरद पवार गटात जातील असाच अंदाज व्यक्त केला जात आहे. वंसत मोरे हे २००७ पासून पुणे महापालिकेत नगरसेवक आहेत. प्रत्येक वेळी ते नवनवीन प्रभागांमधून निवडून आलेले आहेत. कात्रजच्या दोन्ही बाजूकडील भागात त्यांचा प्रभाव आहे.