नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाहनास कट मारल्याच्या वादातून दोघा भावांनी कारचे नुकसान करीत चालकास बेदम मारहाण केल्याची घटना हनुमानवाडी भागात घडली. या घटनेत धातूचे कडे डोक्यात मारण्यात आल्याने कारचालक जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
आशुतोष चंद्रकांत गटमाळे व अक्षय चंद्रकांत गटमाळे (रा.दोघे आरटीओ शेजारी गणेश कॉलनी) अशी कारचालकास मारहाण करणा-या संशयित दोघा भावांची नावे असून याप्रकरणी योगेश विष्णू थेटे (रा.विद्यूतनगर,दसक) यांनी फिर्याद दिली आहे. थेटे रविवारी (दि.१०) हनुमानवाडीतून आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. दुस-या कारमधून आलेल्या संशयितांनी थेटे यांच्या कारला कट मारला.
त्यामुळे थेटे यांनी दोघांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांना मारहाण केली. या घटनेत एकाने हातातील धातूचे वजनी कडे डोक्यावर मारल्यामुळे थेटे जखमी झाले असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.