वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सोशल मीडियावर खूप वेळेस वन्य प्राण्यांचे विविध प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. कधी हल्ला करताना तर कधी एकमेकांत मिसळून राहणारे वन्य प्राणी. उत्तराखंडमधील लोकप्रिय जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये असेच दृश्य पाहायला मिळाले.
IAS संजय कुमार यांनी X वर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचा एक छानसा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की,एका वाघाने हरणाचे बाळ प्रेमाने तोंडात धरले आहे आणि ते काळजीपूर्वक घेऊन जात आहे. सहसा वन्यप्राण्यांना त्यांचे भक्ष्य सापडताच ते प्रथम त्याला मारतात आणि नंतर ते त्यांचे खाद्य बनवतात. पण, वाघिणीने जिवंत हरणाच्या बछड्याला जबड्यात पकडले आहे आणि यामागचे कारणही खूप कमालीचे आहे.
खरंतर ही मादी वाघीण आपल्या तीन महिन्यांच्या पिल्लांना शिकार केल्यानंतर मारण्याची प्रक्रिया शिकवण्यासाठी जिवंत हरणाच्या बछड्याला घेऊन जात आहे. व्हिडीओ शेअर करताना संजय कुमार यांनी लिहिले आहे, ‘कॉर्बेट टीआरच्या ढिकाला झोनमध्ये जंगलाचा एक अद्भुत क्षण कैद झाला! वाघीण आपल्या तीन महिन्यांच्या भुकेल्या शावकांना अंतिम शिकारीसाठी प्रशिक्षित करण्यासाठी जिवंत हरणाच्या पिल्लाला घेऊन जात आहे.’