इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चंदीगडः महापौर निवडणुकीच्या प्रकरणात ‘आम आदमी पक्षा’ला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर काही दिवस उलटत नाही तोच भाजपने वरीष्ठ उपमहापौर व उपमहापौर निवडणुकीत आम आदमी पार्टीला मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत दोन्हीही उमेदवार भाजपचे निवडून आले आहे. वरीष्ठ उपमहापौर म्हणून कुलजीत संधू तर उपमहापौर रजिंदर सिंग यांची वर्णी लागली आहे. त्यांनी आमआदमी पार्टी व काँग्रेसचे उमेदवार गुरुप्रीत बक्षी व निर्मला देवी यांचा पराभव केला आहे.
आम आदमी पार्टीच्या ३ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ३५ नगरसेकांची संख्या असलेल्या महानगरपालिकेचे गणित बदलले. या ठिकाणी भाजपची संख्या १९ झाली तर आप व काँग्रेसच्या मतांचा आकडा २० वरुन १७ वर आला. या निवडणुकीत भाजपला १९ मते मिळाली तर आप व काँग्रेसच्या आघाडीला १७ मते मिळाली. एक मत अवैध ठरले.
काही दिवसापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिका-यांचा निर्णय रद्द करत आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांना विजयी घोषित केले आहे. त्यानंतर कोर्टाने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर ही निवडणूक झाली. त्यात भाजपने सभागृहात मोठा धक्का दिला.