इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः अजित पवार गटाची लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू कैली असताना लोणावळ्यात अजित पवार गटात मोठी नाराजी उसळली आहे. याच नाराजीतून तब्बल १३७ जणांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधातील नाराजीने तोंड वर काढले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे. विनोद होगले हे लोणावळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष होते. आमदारांनी परस्पर लोणावळा युवक शहराध्यक्ष पद दुसऱ्याला दिल्याने महिला, युवती, तरुणांनी राजीनामा दिले.
पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. २०-२५ वर्षे काम करूनही इतरांना संधी का? असा सवाल राजीनामा दिलेल्यांनी केला आहे. लोणावळा युवक शहराध्यक्षपदी मंगेश मावकर यांना संधी देण्यात आल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.