इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः मराठा आंदोलनाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आव्हान स्वीकारले आहे. आता दूध का दूध पानी का पानी होऊनच जाऊदे. मीदेखील सर्व काही उघड करतो असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे.
आ. आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोळी चालवत आहेत, असा आरोप करून सलाईन उचलून चौकशीला सामोरा येतो, असे ते म्हणाले. फडणवीस हे मराठ्यांविरोधात काम करीत राहतील तोपर्यंत आम्ही बोलत राहणार’, अशा शब्दांत त्यांनी फडणवीस यांच्याविरोधातील आपली भूमिका ठाम असल्याचे सांगितले. एसआयटीला घाबरत नसल्याचे सांगताना मी कुठे चुकत नाही आणि कुठेच गुंतू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले असून, कॉलवर काय काय बोलले, हे उघड करण्याचा इशारा देऊन जरांगे पाटील म्हणाले, की सत्ता त्यांच्या हाती आहे. तुरुंगात घेऊन जा, चौकशी लावा. कर नाही त्याला डर कशाला? मी मराठा समाज आणि सरकारमधील काटा आहे. सरकार आणण्यासाठी ते गुंतवणारच. कोणत्याही चौकशीला सामोरे जायची तयारी आहे. माझ्याकडे कोणाचेच पैसे नाहीत, असे त्यांनी सांगितले.
मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका. मराठा समाजातील वकिलांनी गुन्हे दाखल झालेल्यांसाठी मोफत लढावे. न्यायालयातून जामीन मिळवा. फडणवीस हे मुद्दाम करीत आहेत. सर्वांनी शांततेत राहा. मी काय करायचे ते पाहतो, असा इशारा जरांगे यांनी दिला.