इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक, कॅनरा बँक आणि सिटी युनियन बँकेला दंड ठोठावला आहे. या तिन्ही बँकांना सुमारे तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की ठेवीदार एज्युकेशन अवेअरनेस फंड स्कीम, २०१४ शी संबंधित काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल स्टेट बँकेला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सिटी युनियन बँक लिमिटेडला उत्पन्न प्रमाणीकरण, मालमत्ता वर्गीकरण आणि कर्ज संबंधित तरतुदी, अनुत्पादित कर्ज (एनपीए) आणि केवायसी संबंधित तरतुदींशी संबंधित रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल ६६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. काही सूचनांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने कॅनरा बँकेला ३२.३० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) संबंधित काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल ओडिशातील राउरकेलाच्या ओशन कॅपिटल मार्केट लिमिटेडवर १६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या या कारवाईनंतर, हे स्पष्ट झाले की, नियामक अनुपालनातील त्रुटींसाठी बँका आणि ‘एनबीएफसी’वर दंड आकारण्यात आला आहे. बँक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार किंवा कराराशी त्याचा काहीही संबंध नसल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.