नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिका-यांमध्ये फेरबदल करण्यात आले. नाशिक लोकसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेले जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची लोकसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. तर नाशिक महानगरप्रमुख असलेले सुधाकर बडगुजर यांना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर महनगरप्रमुखपदाची जबाबदारी माजी गटनेते विलास शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आले आहे. या बदलामुळे ठाकरे गटाला काम करणे सोपे जाणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला सुटणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीच्या पवार गटाने व काँग्रेसने या जागेसाठी फारसा आग्रह केलेला नाही. त्यामुळे या मतदार संघात ठाकरे गटाचे विजय करंजकर हे उमदेवार असणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.
भाजपने या मतदार संघात आपला उमेदवार उतरवण्याचा आग्रह धरला आहे. पण, शिंदे गटाचे विद्यमान खा. हेमंत गोडेसे असल्यामुळे ही जागा शिंदे गटाला सुटणार असल्याचे बोलले जात आहे.