इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रांचीः झारखंडमध्ये चंपई सोरेन यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा नवे सरकार स्थापन झाले असले तरी अडचणी मात्र संपल्या नाही. आता काँग्रेस आमदार नाराज झाले आहेत. काँग्रेसच्या आठ आमदारांनी पक्षाच्या चार आमदारांच्या मंत्रिपदावर आक्षेप घेतला असून मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांची मागणी केली आहे. पक्ष नेतृत्वाकडे हे प्रकरण मांडण्यासाठी नवी दिल्लीला ते दाखल झाले आहे.
याअगोदरच झारखंड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी पक्षाच्या आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर तेही दिल्लीत दाखल झाले आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही एकत्र बसून समस्येवर तोडगा काढू. ८१ सदस्यांच्या विधानसभेत सरकारच्या समर्थनार्थ ४७ आमदार आहेत. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) २९, काँग्रेसचे १७ आणि राष्ट्रीय जनता दलाचा एक सदस्य आहेत.
दिल्लीत आलेल्या आठ आमदारांमध्ये इरफान अन्सारी, भूषण बडा, कुमार जयमंगल, राजेश कछाप, अंबा प्रसाद, दीपिका पांडे, सोनाराम सिंकू आणि उमाशंकर अकेला यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या चार मंत्र्यांना हटवण्याची आमची मागणी पूर्ण झाली नाही, तर आम्ही विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार नाही, असा इशारा बंडखोर आमदारांनी दिला आहे.