निलेश गौतम, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सटाणा- अमर रहे, अमर रहे, राकेश काकुळते अमर रहे अशा घोषणा देत आज बागलाण तालुक्यातील किकवारी गाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी वीर जवान राकेश काकुळते यांना साश्रुंयनांनी अखेरचा निरोप दिला. येथील शेतकरी गोकुळ नामदेव काकुळते यांचा सुपुत्र असलेला राकेश हा २००४ मध्ये भारतीय लष्करात दाखल झाला होता. बेळगाव येथील मराठा बटालियन मध्ये खडतर असे प्रशिक्षण घेऊन भारतीय लष्करी सेवेत दाखल झालेल्या राकेशने जम्मू काश्मीर सह देशातील अनेक भागात देशसेवा केली होती.
सुरत येथे कर्तव्यावर असलेल्या राकेश काकुळते (३७)याला हृदविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. राकेशच्या निधनाचे वृत्त किकवारी व परिसरात आल्यानंतर संपूर्ण किकवारी गाव आणि परिसराने राकेश राहत असलेल्या निवासस्थानी गर्दी केली होती. रविवारी सकाळी ११ च्या दरम्यान सुरत येथून रुग्णवाहिकेने राकेशचे पार्थिव किकवारी गावात आणण्यात आले. यानंतर देवळाली आर्टलरी सेंटर येथून आलेल्या लष्करी वाहनातून राकेशच्या पार्थिव देहाची मिरवणुक गावातून काढण्यात आली. वीरजवान राकेश वर गावाशेजारील मोकळ्या पटांगणात अंतिम संस्कार करण्यात आले.
यावेळी शासनाच्या वतीने बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी वीर जवान राकेश यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय प्रांत अधिकारी बबनराव काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, तहसीलदार कैलास चावडे ,पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, यांनी पुष्पचक्र अर्पण केली तर लष्कराच्यावतीने देवळाली आर्टलरी सेंटर चे मेजर नकुल गोस्वामी यांनी पुष्पचक्र अर्पण केले.यावेळी सुभेदार राम कीर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली येथून आलेल्या बारा लष्करी जवानांनी शहीद काकुळते यांना मानवंदना देत श्रद्धांजली अर्पण केली.
तर महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने नाशिक येथील ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक नारायण कोरडे व पोलीस हवालदार योगेश नाईक यांच्या पथकाने मानवंदना व सलामी दिली.