इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीः बारामती दौ-यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलेल्या भावना सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी परिवारात एकटे पाडण्यात आल्याची भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, की संसदेत भाषण करून प्रश्न सुटत नाही. उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळाला म्हणजे कामे होत नाहीत. त्यासाठी तडफ असावी लागते. मी आणि माझा परिवार सोडला तर सर्व जण माझ्या विरोधात प्रचार करतील. मला एकटे पाडतील. घरातील सर्व माझ्या विरोधात गेले, तरी तुम्ही माझ्याबरोबर असल्याने मला काळजी नाही, असे अजित पवार म्हणाले.
काही जण भावनिक होऊन तुमच्यासमोर येतील; परंतु भावनेने काम होत नाही. प्रश्न सुटत नाही. रोजगार मिळत नाही. त्यासाठी तडफ लागते, अशी टीका करून ते म्हणाले, की आपल्या राष्ट्रवादीसोबत भाजप आणि शिवसेना आहे. आपले घड्याळ तेच आहे, वेळ नवी आहे.