नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील उड्डाणपूलावर भरधाव वाहनाने कट मारल्याने रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वारास दुस-या चारचाकीने चिरडल्याची घटना घडली. या घटनेत चारचाकीचे चाक डोक्यावरून गेल्याने तरूणाचा चेंदामेदा झाला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोन चारचाकी वाहनांच्या चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नील शिवाजी ढोली (२६ रा.विनयनगर,नाशिक) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. ढोली शनिवारी (दि.१०) रात्री पाथर्डी फाटा बाजूकडून आपल्या घरी जाण्यासाठी मुंबईनाक्याच्या दिशेने आपल्या दुचाकीवर एमएच १५ एचझेड ४५७३ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. सेव्हन अॅपल हॉटेल समोरील उड्डाणपूलावरून तो प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या चारचाकीने दुचाकीस कट मारला. त्यामुळे नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली.
या अपघातात स्वप्नील ढोली याचे हेल्मेट निघून गेल्याने तो रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होता. याचवेळी दुस-या वाहनाचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. हा अपघात इतका भयंकर होता की चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. १०८ अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून अंमलदार शिरवले यांनी त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ. रोहित शिंदे यांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत ऋषिकेश ढोली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.