नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) नागपुरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. महाल येथील बुधवार बाजार, दिव्यांग पार्क, गोकुळपेठ मार्केट, दिव्यांग स्टेडियम, धापेवाडा येथील एसटीपी प्रकल्प आदी विषयांवर अधिकाऱ्यांसोबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.
मंत्री महोदयांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आदींची यावेळी उपस्थिती होती. ना. श्री. नितीन गडकरी यांनी सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी प्रस्तावित असलेले प्रकल्प तातडीने पूर्णत्वास नेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. महाल येथील बुधवार बाजाराच्या संदर्भातील संपूर्ण कायदेशीर कार्यवाही पूर्ण झालेली असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली. त्यावर तातडीने बांधकाम सुरू करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले. जुना भंडारा रोडच्या रुंदीकरण प्रक्रियेबद्दलही यावेळी चर्चा झाली.
याठिकाणच्या ५७ लोकांनी खरेदी-विक्रीच्या माध्यमातून जमीन हस्तांतरित केल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यावर लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने इतर स्थानिकांच्या जमिनीसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या. पूर्व नागपूरमधील लता मंगेशकर उद्यानाशेजारी दिव्यांग पार्कचे काम सुरू आहे. ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारत आहे. शहरातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी हा प्रकल्प आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याने याच्या कामाला आणखी वेग द्यावा. तसेच दिव्यांगांच्या पालकांच्या विरंगुळ्याची सोय देखील याठिकाणी करावी, असे निर्देश ना. श्री. नितीन गडकरी यांनी यावेळी दिले. गोकुळपेठ मार्केटचे डिझाईन व आर्किटेक्ट निश्चित झाल्याची माहिती नासुप्र सभापतींनी दिली. त्यावर सर्व दुकानदारांशी समन्वय साधून काम सुरू करावे, अशा सूचना मंत्री महोदयांनी दिल्या. धापेवाडा येथे होऊ घातलेल्या एसटीपी प्रकल्पाच्या तांत्रिक बाजुंवर चर्चा करून पुढील कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश ना. श्री. नितीन गडकरी यांनी दिले.