इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील गळती थांबायला तयार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंचे विश्वासू सहकारी आ. रवींद्र वायकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.
वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचे ठाकरे यांच्यांशी चांगले कौंटुबिक संबंध आहेत. त्यांच्यासोबत त्या भागातील नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखदेखील शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करणार आहेत. वायकर यांच्यावर कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खा. सदार संजय राऊत यांनी ट्वीट केले होते. ते म्हणाले, की वायकर यांना ‘ईडी’कडून धमक्या येत आहेत. शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला लागणार असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या आमदाराने गुप्त भेट घेतल्याचीही चर्चा होती; मात्र हा आमदार नेमका कोण, हे समजू शकले नव्हते. आता हा आमदार म्हणजे वायकर असल्याचे स्पष्ट झाले आहे.