मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे सोपवले असले, तरी विधानसभा अध्यक्षांकडील आमदार अपात्रता याचिकेचा निकाल आणि निवडणूक आयोगाचा निकाल याचा काहीही संबंध असणार नाही, असे स्पष्टीकरण अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणी गुणवत्तेनुसारचज निकाल दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध आमदार अपात्रता प्रकरणाशी जोडला जाणार नाही, असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसबाबबत विधान भावनाने कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिले असून हा शरद पवार यांना मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणते आमदार पात्र आणि कोणते आमदार अपात्र होणार, याची उत्सुकता लागली आहे.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकर १४ तारखेला निकाल देणार आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला होता. त्या वेळी त्यांनी एकाही आमदाराला अपात्र ठरवले नव्हते. त्यामुळे आता ते शिवसेनेच्या निकालाचीच पुनरावृत्ती करतात का, याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्व आमदारांची उलटतपासणी झाली आहे.