नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जर्मनीमध्ये न्यूरेमबर्ग येथे ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय खेळणी मेळाव्यात सहभागी झालेल्या भारतीय खेळणी उत्पादकांना १० दशलक्ष डॉलर्स (USD) पेक्षा जास्त किमतीच्या मोठ्या ऑर्डर (मागणी) मिळाल्या आहेत. या खेळणी उत्पादकांनी उच्च दर्जाची उत्पादने प्रदर्शित केली होती, त्यामुळे त्याला मोठी मागणी मिळाल्याचे निर्यातदारांनी सांगितले. गुणवत्तेबाबत अनिवार्य नियम, सीमा शुल्कात वाढ आणि खेळण्यांबाबतची राष्ट्रीय कृती योजना (NAPT), यासारखे सरकारी उपक्रम उच्च दर्जाच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी उपयोगी ठरले असून, ही उत्पादने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रशंसेसाठी पात्र ठरली आहेत, ही गोष्ट भारतीय खेळणी उद्योगाने अधोरेखित केली आहे. भारतीय खेळणी क्षेत्राचा निकोप विकास होत असून, ते जागतिक पातळीवरील खेळणी उद्योगांशी स्पर्धा करत आहे. या मेळाव्यातील सर्वात लोकप्रिय श्रेणींमध्ये लाकडी खेळणी आणि शैक्षणिक खेळण्यांचा समावेश होता.
खेळणी निर्यातदारांनी सांगितले की, यूएस, यूके, दक्षिण आफ्रिका आणि जर्मनीसारख्या देशांतील खरेदीदारांनी त्यांच्या उत्पादनांमध्ये रुची दाखवली, आणि चांगल्या प्रमाणात मागणी नोंदवली. यंदाच्या वर्षी ५५ पेक्षा जास्त भारतीय खेळणी उत्पादक या मेळाव्यात सहभागी झाले होते.
न्यूरेमबर्ग टॉय शो मध्ये सहभागी झालेल्या भारतीय उत्पादकांनी सांगितले की खरेदीदारांच्या दृष्टिकोनात आणि वागणुकीत लक्षणीय बदल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॉय इकॉनॉमी (खेळणी अर्थव्यवस्था) निर्माण करण्यासाठी केलेल्या आवाहनामुळे, भारत आता जागतिक पातळीवर खेळण्यांचा पुरवठादार या रुपात एक फायदेशीर पर्याय म्हणून प्रस्थापित झाला आहे.
या प्रतिष्ठित व्यासपीठाने आंतरराष्ट्रीय संयुक्त उपक्रमांसाठी दरवाजे खुले केल्यामुळे भारतीय उत्पादन परिसंस्थेला जागतिक मान्यता मिळाल्याचे भारतीय खेळणी उत्पादकांनी सांगितले. भारतीय उद्योगाशी भागीदारी करण्यासाठी जागतिक स्तरावरील उद्योगांनी दाखवलेल्या स्वारस्यामुळे, देशांतर्गत उत्पादकांना वाढत्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठेची मागणी पुरी करण्यासाठी आपली उत्पादन क्षमता वाढवण्याचे प्रोत्साहन दिले आहे.
‘मेड इन इंडिया’ खेळण्यांना मिळत असलेली आंतरराष्ट्रीय मान्यता, निर्यात वाढीला हातभार लावेल, अशी अपेक्षा आहे. देशाच्या एकूण खेळणी आयातीमध्ये 2014-15 या आर्थिक वर्षातील 332.55 दशलक्ष डॉलर्सवरून 2022-23 मध्ये 158.7 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच 52% इतकी लक्षणीय घट नोंदवली गेली असून, खेळण्यांच्या निर्यातीत 2014-15 या आर्थिक वर्षातील USD 96.17 दशलक्ष वरून आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये USD 325.72 दशलक्ष, म्हणजेच 239% इतकी वाढ नोंदवली गेली आहे.
भारतीय खेळणी उत्पादकांनी जर्मनीमध्ये मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर, स्नॅपडील आणि वॉलमार्टसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या खेळणी उत्पादकांबरोबर सहयोगाचा मार्ग खुला झाला आहे. सरकार आणि उद्योग यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे क्षेत्र भविष्यात आणखी यश मिळवण्यासाठी सज्ज आहे. न्युरेमबर्ग येथील आंतरराष्ट्रीय खेळणी मेळावा 3 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाला. या जगातील सर्वात भव्य खेळणी मेळाव्यात 65 हून अधिक देशांमधील 2,000 हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले होते.