नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कृषीनगर भागात प्रेमप्रकरणाच्या संशयातून एकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत ४७ वर्षीय व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून दादू विनोद गांगुर्डे व त्याचा मित्र (रा.दोघे म्हसरूळ) अशी संशयित हल्लेखोरांचे नाव आहे. याबाबत विनोद भालचंद्र खैरणार (४७ रा.हर्षवर्धन सोसा.मखमलाबादनाका) यांनी फिर्याद दिली आहे. खैरणार हे शनिवारी (दि.३) कृषीनगर भागात गेले होते. कृषीनगर जॉगिंग ट्रॅकच्या भिंतीजवळून ते जात असतांना दुचाकीवर आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांना गाठले.
खैरणार यांची वाट अडवित दोघांनी यापूर्वीही तू मला नडला होता. या कारणातून वाद घालत त्यांना शिवीगाळ केली. तसेच कमरेच्या बेल्टच्या सहाय्याने त्यांना मारहाण केली. यावेळी संतप्त दादू गांगुर्डे याने वाहनाच्या डिक्कीतील धारदार शस्त्र काढून जीवे मारण्याची धमकी देत खैरणार यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून जखमी केले. आईशी असलेल्या प्रेमसंबधातून ही घटना घडल्याचे बोलले जात असून अधिक तपास हवालदार पगार करीत आहेत.