इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आळंदीः अयोध्येनंतर आता काशी आणि मथुरेतील हिंदूंच्या ‘मूळ स्थळांची’ मागणी जोर धरू लागली आहे. या दोन्ही ठिकाणांबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज म्हणाले, की अयोध्येनंतर काशी आणि मथुरा शांततेने मुक्त झाले, तर परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या इतर सर्व मंदिरांशी संबंधित समस्या हिंदू समाज विसरेल. परकीय हल्ल्यात साडेतीन हजार हिंदू मंदिरे उद्ध्वस्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
गोविंद देव गिरी महाराज यांनी आळंदी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि श्री श्री रविशंकर आदी उपस्थित राहणार आहेत. ते म्हणाले, की जर ही तीन मंदिरे मुक्त झाली, तर आम्हाला इतर मशिदी पाहण्याची इच्छाही नाही, कारण आम्हाला भूतकाळात नाही तर भविष्यात जगायचे आहे. देश भारताचे भवितव्य चांगले असावे, म्हणून जर उरलेली दोन मंदिरे (काशी आणि मथुरा) शांततेने आणि प्रेमाने आमच्या स्वाधीन केली तर आम्ही बाकी सर्व विसरून जाऊ.
गोविंददेव महाराजांनी मुस्लिम समाजाला शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याच्या त्यांच्या मागणीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की हे प्रकरण केवळ हल्ल्यांच्या खुणा पुसण्यासाठी आहे आणि त्याला दोन समुदायांमधील समस्या मानू नये. ते म्हणाले, की आमची हात जोडून प्रार्थना आहे, की ही तीन मंदिरे अयोध्या, ज्ञानवापी आणि कृष्णजन्मभूमी ताब्यात द्यावीत. कारण आक्रमणकर्त्यांनी आपल्यावर केलेल्या हल्ल्यांचे हे सर्वात मोठे चिन्ह आहेत. त्यामुळे लोकांमध्ये खूप वेदना आहेत. जर त्यांनी शांततेने ही वेदना दूर केली, तर बंधुभाव वाढवण्यासाठी अधिक सहकार्य होईल.