इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ फेब्रुवारी रोजी गोव्याला भेट देणार आहेत. साधारण सकाळी साडे दहा वाजता पंतप्रधान ओ एन जी सी सी सर्व्हायव्हल सेंटरचे उदघाटन करतील. पावणे आकाराच्या सुमारास, पंतप्रधानांच्या हस्ते भारत ऊर्जा सप्ताह २०२४ चे उदघाटन होणार आहे. त्यांनतर दुपारी २.४५ वाजता, ते विकसित भारत, विकसित गोवा २०४७ कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
भारत ऊर्जा सप्ताह २०२४
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्याच्या क्षेत्राला पंतप्रधानांचे प्राधान्य आहे. याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल म्हणजे गोवा इथे ६-९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेला भारत ऊर्जा सप्ताह २०२४. संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळी एकत्र आणणारे हे भारतातील सर्वात मोठे आणि एकमेव सर्वसमावेशक ऊर्जा प्रदर्शन आणि परिषद असेल आणि भारताच्या ऊर्जा संक्रमणाच्या उद्दिष्टांसाठी ते प्रेरणादायी ठरेल. पंतप्रधान, इंधन आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील तज्ञ आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी गोलमेज परिषदेत संवाद साधतील.
स्टार्ट अप्सना प्रोत्साहन देऊन त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करणे आणि त्यांना ऊर्जा मूल्य साखळीत समाविष्ट करणे यावर भारत ऊर्जा सप्ताह २०२४ चा अधिक भर असेल. यात जगभरातून १७ हून अधिक मंत्र्यांची उपस्थिती असेल. ३५ हजार हून अधिक प्रतिनिधी, ९०० प्रदर्शक यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. यात कॅनडा, जर्मनी, नेदरलँड, रशिया, यूके आणि यूएसए असे सहा समर्पित कंट्री पॅव्हेलियन असतील. याशिवाय भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची ऊर्जा क्षेत्रातील कामगिरी दर्शवण्यासाठी एका विशेष मेक इन इंडिया पॅव्हेलियनचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.