नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ६ फेब्रुवारी २०२४ रोजी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा भरणार असून या यात्रेनिमित्त लाखो भाविक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दाखल होतात व संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतात. यात्रेकरिता लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होवू नये व भाविकांना संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जाता यावे यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलींकच्यावतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
सदयस्थितीत सिटीलींकच्यावतीने नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर व निमाणी ते त्र्यंबकेश्वर या मार्गावर दैनंदिन २८ बसेसच्या माध्यमातून एकूण १८० बसफेर्या चालविण्यात येतात. परंतु यात्रेदरम्यान भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सिटीलींकच्यावतीने तपोवन डेपोच्या ३ व नाशिकरोड डेपोच्या ११ अशा एकूण १४ जादा बसेसचचे नियोजन केले असून या १४ बसेसच्या माध्यमातून एकूण ९० अतिरिक्त बसफेर्या करण्यात येणार आहे.
६ व ७ फेब्रुवारी २०२४ असे दोन दिवस या अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या दोनही दिवशी दैनंदिन २८ व अतिरिक्त ११ अशा एकूण ३९ बसेसच्या माध्यमातून २७० बसफेर्या करण्यात येणार आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी या जादा बसेसचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलींकच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच प्रवासदरम्यान भाविकांना बसेस संदर्भात कोणताही अडचण आल्यास कृपया ८५३००५७२२२ / ८५३००६७२२२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.