इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील गुवाहाटी येथे ११ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. गुवाहाटीमधील मुख्य लक्षीत क्षेत्रांमध्ये क्रीडा आणि वैद्यकीय पायाभूत सुविधा तसेच संपर्क सुविधेला चालना देणारे प्रकल्प समाविष्ट आहेत.
मेळाव्याला संबोधित करताना, ११ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी आज कामाख्या मातेच्या आशीर्वादाने आसाममध्ये उपस्थित राहताना त्याप्रती पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. आजच्या विकास प्रकल्पांमुळे आसामचा ईशान्येकडील राज्ये तसेच आग्नेय आशियातील भारताच्या शेजारी देशांशी संपर्क वाढेल, तसेच पर्यटन क्षेत्रात रोजगाराला चालना मिळेल आणि राज्यातील क्रीडा प्रतिभावंतांसाठी नवीन संधी निर्माण होतील, असे पंतप्रधान म्हणाले. आजच्या विकास प्रकल्पांमुळे राज्यातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा क्षेत्राच्या होणाऱ्या विस्ताराचाही त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनी आजच्या विकास प्रकल्पासाठी आसाम आणि ईशान्येकडील प्रदेशातील लोकांचे अभिनंदन केले आणि काल संध्याकाळी पंतप्रधानांचे गुवाहाटीत आगमन झाले तेव्हा स्थानिक नागरिकांनी केलेल्या उत्साही स्वागताबद्दल त्यांनी हार्दिक आभार मानले.
आपल्या अलीकडच्या काळातील अनेक तीर्थक्षेत्रांना दिलेल्या भेटींचे स्मरण करून, पंतप्रधानांनी आज कामाख्या मातेसमक्ष हजर होता आल्याबद्दल आणि माँ कामाख्या दिव्य लोकपरियोजनेची पायाभरणी करता आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रकल्पाच्या संकल्पनेवर आणि व्याप्तीवर प्रकाश टाकत, पंतप्रधान मोदींनी सांगितले की हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर भाविकांना कामाख्या माता मंदिरात दर्शनासाठी प्रवेश आणि इतर सुविधांमध्ये आणखी वाढ होईल तसेच भाविकांच्या संख्येतही वाढ होईल. “कामाख्या मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होऊन आसाम हे ईशान्येकडील पर्यटनाचे प्रवेशद्वार बनेल”, असे पंतप्रधानांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले.
भारतीय तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांचे महत्त्व अधोरेखित करताना, ही ठिकाणे हजारो वर्षांच्या आपल्या सभ्यतेची आणि भारताने आपल्यावर आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना कसा केला हे दाखवून देणारी अमिट चिन्हे आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. ज्या संस्कृती पूर्वी समृद्ध समजल्या जात होत्या त्या आता कशा उद्ध्वस्त झाल्या आहेत हे आपण पाहिले आहे, असे ते म्हणाले. राजकीय फायद्यासाठी स्वत:च्या संस्कृतीची आणि अस्मितेची लाज बाळगण्याचा प्रघात पाडणाऱ्या आणि भारताच्या पवित्र स्थळांचे महत्त्व समजण्यात अपयशी ठरणाऱ्या स्वातंत्र्योत्तर काळातील सरकारांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त केला. ‘विकास’ (विकास) आणि ‘विरासत’ (वारसा) या दोन्हींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या धोरणांच्या मदतीने गेल्या १० वर्षांत हा प्रघात मोडीत काढण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
आसाममधील लोकांसाठी या धोरणांचे फायदे स्पष्ट करताना, पंतप्रधानांनी राज्यातील ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळांना आधुनिक सुविधांसह जोडण्याच्या महत्त्वावर भर दिला आणि आजचा कार्यक्रम या स्थळांचे जतन करणे तसेच विकासाला गती देण्याच्या उद्देशाने एक पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले. आयआयटी आणि आयआयएम सारख्या नामवंत शैक्षणिक संस्थांच्या विस्ताराकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की, पूर्वी या संस्था केवळ मोठ्या शहरांमध्ये स्थापन केल्या जात होत्या. मात्र, आता देशभरात आयआयटी, आयआयएम आणि एम्सचे जाळे पसरले असून आसाममधील एकूण वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ६ होती, ती वाढून १२ झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. हळूहळू आसाम हे ईशान्येकडील राज्यांसाठी कर्करोगाच्या उपचारांचे महत्वाचे केंद्र बनणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
“लोकांचे जीवन सुलभ करण्याला सध्याच्या सरकारचे प्राधान्य आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांसाठी 4 कोटी पक्की घरे बांधणे, नळ जोडणी, वीज, उज्ज्वला योजनेंतर्गत स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी आणि स्वच्छ भारत योजने अंतर्गत शौचालये बांधण्याचाही उल्लेख केला.
सरकारने विकासाबरोबरच वारशाचे जतन करण्यावर लक्ष केंद्रित केल्याने भारतातील तरुणांना मोठा फायदा झाला आहे, असे पंतप्रधान अधोरेखित केले. देशातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांबद्दलचा वाढता उत्साह लक्षात घेऊन पंतप्रधानांनी काशी कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर वाराणसीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या विक्रमी गर्दीची माहिती दिली. “गेल्या वर्षात, 8.50 कोटी लोकांनी काशीला भेट दिली आहे, 5 कोटींहून अधिक लोकांनी उज्जैन मधील महाकाल लोकला भेट दिली आहे आणि 19 लाखांहून अधिक भाविकांनी केदारधामला भेट दिली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली. राम मंदिरात, प्राणप्रतिष्ठेनंतर गेल्या 12 दिवसांत 24 लाखांहून अधिक लोकांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. माँ कामाख्या दिव्य लोकपरियोजना पूर्ण झाल्यानंतर असेच दृश्य येथेही पाहायला मिळेल,याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
रिक्षाचालक असो, टॅक्सी चालक असो, हॉटेल मालक असो किंवा रस्त्यावरचा फेरीवाला असो, यात्रेकरू आणि भाविकांच्या गर्दीमुळे अगदी गरिबातील गरीब व्यक्तीच्या जीवनमानाला चालना मिळते असे पंतप्रधानांनी नमूद केले. यावर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने पर्यटनावर भर दिल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. “केंद्र सरकार ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांच्या विकासासाठी नवीन योजना सुरू करणार आहे”, असे सांगत, या संदर्भात ईशान्येकडील राज्यांसमोर असलेल्या असंख्य संधींवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. त्यामुळेच ईशान्येकडील राज्यांच्या विकासावर सरकार विशेष भर देत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
गेल्या 10 वर्षात ईशान्येकडील राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या विक्रमी संख्येकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की, या प्रदेशाचे सौंदर्य याआधी अस्तित्वात असले तरीही याभागातील हिंसाचार आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे तसेच मागील सरकारांनी या राज्यांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पर्यटकांची संख्या अत्यंत कमी होती. एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ात जाण्यासाठी लागणारा अनेक तासांचा कालावधी तसेच प्रदेशातील खराब हवाई, रेल्वे आणि रस्ते संपर्क सेवांचा उल्लेख त्यांनी केला. राज्यातील सर्वांगीण विकासाचे श्रेय पंतप्रधानांनी केंद्र आणि राज्य पातळीवरील डबल इंजिन सरकारला दिले.
पंतप्रधान मोदींनी माहिती दिली की सरकारने प्रदेशाच्या विकास खर्चात 4 पट वाढ केली आहे. 2014 पूर्वी आणि नंतरची तुलना करताना, पंतप्रधानांनी सांगितले की, रेल्वे मार्ग 1900 किलोमीटरपेक्षा जास्त वाढवण्यात आले आहेत. रेल्वे बजेटमध्ये जवळपास 400 टक्के वाढ झाली आहे तसेच वर्ष 2014 पर्यंत बांधण्यात आलेल्या 10,000 किलोमीटर लांबीच्या तुलनेत केवळ गेल्या 10 वर्षांत 6,000 किलोमीटर नवीन राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहेत. आजच्या प्रकल्पांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की या रस्ते प्रकल्पामुळे इटानगर शहराची कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल.
गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांना मूलभूत सुविधांची हमी देण्याचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले,मोदींची हमी म्हणजे पूर्तीची हमी. सरकारी योजनांपासून वंचित राहिलेल्यांना लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा आणि ‘मोदींचे गॅरंटी वाहन’ यावर त्यांनी लक्ष वेधले. “देशभरातील सुमारे 20 कोटी लोक विकास भारत संकल्प यात्रेत थेट सहभागी झाले आहेत. आसाममधील मोठ्या संख्येने लोकांना त्याचा लाभ मिळाला आहे असे त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट करताना, पंतप्रधानांनी प्रत्येक नागरिकाचे जीवन सुलभ करण्याचे जे वचन दिले होते, त्याचीच पुष्टी या वर्षीच्या अर्थसंकल्पीय घोषणांमध्येही दिसून येते. या वर्षी सरकारने पायाभूत सुविधांवर 11 लाख कोटी रुपये खर्च करण्याचे वचन दिले असून, पायाभूत सुविधांवर अशा प्रकारच्या होणाऱ्या खर्चामुळे अधिक रोजगार निर्माण होतो आणि विकासाला गती मिळते. 2014 पूर्वी गेल्या 10 वर्षांत आसामच्या पायाभूत सुविधांबाबतचे एकूण बजेट 12 लाख कोटी रुपये होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
गेल्या 10 वर्षात प्रत्येक घरात वीज पुरवठा करण्यावर सरकारने भर दिल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. घराच्या छतावर सौर उर्जा प्रणाली योजनेच्या अंमलबजावणीसह वीज बिल शून्यावर आणण्याच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पात घेतलेल्या निर्णयाची माहिती त्यांनी दिली, ज्यामध्ये सरकार एक कोटी कुटुंबांना छतावर सौर उर्जा प्रणाली बसवण्यासाठी मदत करेल. “यामुळे त्यांचे वीज बिल देखील शून्य होईल आणि सामान्य कुटुंबांना त्यांच्या घरी वीज निर्माण करून कमाई करता येईल”, असेही ते म्हणाले.
देशात 2 कोटी लखपती दीदी निर्माण करण्याच्या हमीकडे लक्ष वेधून पंतप्रधान मोदींनी सांगितले की, गेल्या वर्षी ही संख्या १ कोटींवर पोहोचली होती आणि आता या वर्षीच्या अर्थसंकल्पात ३ कोटी लखपती दीदीं बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आसाममधील लाखो महिलांनाही याचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी बचत गटांशी संबंधित सर्व महिलांसाठी असलेल्या नवीन संधी आणि आयुष्मान योजनेत अंगणवाडी आणि आशा सेविकांचा समावेश करणार असल्याचेही सांगितले.
“रात्रंदिवस काम करत आपण दिलेल्या हमींची पूर्तता करण्याचा मोदींचा संकल्प आहे”, असे नमूद करत पंतप्रधान म्हणाले, ईशान्ये कडील लक्षात प्रदेशांचा मोदींच्या हमींवर विश्वास आहे.हिंसाचाराचा फटका बसलेल्या आसामच्या भागात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित केल्याचा आणि राज्यांमधील सीमा विवाद सोडवल्याचा त्यांनी उल्लेख केला. “येथे १० हून अधिक प्रमुख शांतता करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे”, अशी माहिती देतानाच ते म्हणाले की, ईशान्येकडील हजारो तरुणांनी गेल्या काही वर्षांत हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाचा मार्ग निवडला आहे. ते पुढे म्हणाले की, यापैकी आसाममधील ७ हजाराहून अधिक तरुणांनीही शस्त्रत्याग करत देशाच्या विकासात खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचा संकल्प केला आहे. अनेक जिल्ह्यांतील सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा (एएफएसपीए) हटवण्यावर प्रकाश टाकून ते म्हणाले की, हिंसाचाराने प्रभावित झालेल्या भागांचा आज सरकारच्या पाठिंब्याने लोकांच्या आकांक्षेनुसार विकास केला जात आहे.
पंतप्रधानांनी आपली लक्ष्ये निश्चित करण्याच्या महत्त्वावर भर दिला आणि असे प्रतिपादन केले की, मागील सरकारांमध्ये उद्दिष्टांची कमतरता होती आणि कठोर परिश्रम करण्यात ती सरकारे अयशस्वी ठरली. पूर्व आशिया प्रमाणेच ईशान्येचा विकास कल्पत उत्तर आणि पूर्व आशियामध्ये विस्तारित कनेक्टिव्हिटी सुलभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दक्षिण आशिया उपप्रादेशिक आर्थिक सहकार्यांतर्गत राज्यातील अनेक रस्ते सुधारित केले जाणार आहेत, ज्यामुळे ईशान्येकडील प्रदेशांना व्यापार केंद्रात रूपांतरित केले जाईल. पूर्व आशिया प्रमाणेच आपल्या प्रदेशाचा विकास पाहण्याच्या ईशान्येतील तरुणांच्या आकांक्षा लक्षात घेत त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा आपला निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला.
आज होत असलेल्या सर्व विकासकामांमागे भारत आणि येथील नागरिकांचे सुखी आणि समृद्ध जीवन हेच उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय आहे. ” विकसित भारत 2047″ हे उद्दिष्ट आहे, या कार्यात आसाम आणि ईशान्येकडील प्रदेशांना मोठी भूमिका बजावावी लागणार आहे असे म्हणत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
यावेळी आसामचे राज्यपाल गुलाब चंद कटराई, आसामचे मुख्यमंत्री डॉ.हिमंता बिस्वा सरमा आणि केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आदी मान्यवर उपस्थित होते.