बारामती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधत बाबुजी नाईक वाडा परिसर विकसित करा; कामे करतांना वाड्याचे मूळ रूप जतन झाले पाहिजे यासाठी वास्तुविशारदची मदत घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बारामती परिसरातील विद्या प्रतिष्ठान ते जळोची रस्ता, ३५५ दशलक्ष क्षमता असेलल्या साठवण तलावाशेजारील कॅनॉल सुशोभिकरण, तीन हत्ती चौक येथील ट्राफिक कन्सल्टन्ट यांच्या प्रस्तावित लाईन आऊट, कन्हा नदी सुशोभिकरणाअंतर्गत सुरु असलेल्या लेंढी नाला व कसबा पूल व श्रीमंत बाबुजी नाईक वाडा, दशक्रिया घाट परिसर तसेच नवीन बारामती बस स्थानक येथील विविध विकास कामांची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.विद्या प्रतिष्ठान ते जळोची रस्त्याची एम.आय.डी.सी अंतर्गत करण्यात येणाऱ्या सुशोभिकरणाअंतर्गत रस्त्याच्याकडेला शौचालयाची उभारणी करावी. रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षाची इतरत्र पुनर्लागवड करावी. तीन हत्ती चौक येथील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता आवश्यकता असल्यास सिग्नलची उभारणी करावी.
३५५ दशलक्ष क्षमता असेलल्या साठवण तलाव शेजारील कॅनॉल सुशोभिकरणाची कामे करतांना नागरिकांची वर्दळ लक्षात घेता शौचालयाची उभारणी करावी. त्यामध्ये लहान मुलांसाठी वेगळी शौचालयाची व्यवस्था करावी. तलाव परिसर स्वच्छ राहील याबाबत दक्षता घ्यावी. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करण्यात यावे.
कऱ्हा नदी सुशोभिकरणाअंतर्गत सुरु असलेल्या लेंढी नाला व कसबा पूल व श्रीमंत बाबुजी नाईक वाडा येथील विकासकामे करतांना परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे. परिसरात असलेल्या वृक्षाला गोल दगडी ओटा करा. कसबा पुलावरील कठड्याला डोळ्याला त्रास होणार आणि परिसराला शोभेल अशी रंगरंगोटी करावी. लेंढी नाला परिसरातील बंधाऱ्याची कामे गतीने पूर्ण करा. पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्या.
परिसर देखभाल दुरुस्तीसाठी नगर परिषदेने उत्पन्नाचे स्रोत निर्मितीबाबत विचार करावा बारामती बसस्थानक इमारत नूतनीकरणाची कामे करतांना नागरिकांना स्पष्ट दिसेल असे नामफलक लावा. बसस्थानक परिसर स्वच्छ राहील, याबाबत काळजी घ्यावी. येत्या काळात बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात येणार असून त्यादृष्टीने गतीने कामे पूर्ण करावीत, असेही श्री.पवार म्हणाले.
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक सभा मंडपाचे उद्घाटन पाहणी दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते मळद गावठाण येथील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक सभा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, बसस्थानक आगार प्रमुख वृषाली तांबे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव आदी यावेळी उपस्थित होते.