इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केल्यानंतर बुधवारी दिल्लीतल्या अरूण जेटली मैदानावर भारताचा मुकाबला अफगाणिस्तान संघासोबत होणार आहे. या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १४ ऑक्टोंबरला भारत व पाकिस्तान सामना अहमादाबादम्या होणार आहे. त्याअगोदर हा सामना भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कोणत्याही संघाला कमकुमत न समजता भारत हा सामना पुर्णक्षमतेने खेळणार आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार होणार आहे.
पाकीस्तानने श्रीलंकेचा केला पराभव
मंगळवारी विश्वचषक क्रिकेट २०२३ च्या स्पर्धेत झालेल्या दोन सामन्यात पाकिस्तान संघाने श्रीलंकेचा तर इंग्लडने बांग्लादेशचा पराभव करून प्रत्येकी २ गुणांची महत्वपूर्ण कमाई केली आहे. आता या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व संघांच्या दुस-या सामन्याची फेरी सुरू झाल्याने स्पर्धेतील चुरस हळूहळू वाढायला सुरूवात होणार आहे.
श्रीलंका आणि पाकिस्तान या दोघांमध्ये हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडीअममध्ये पार पडलेल्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर ६ गडी राखून मात केली. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करतांना ५० षटकात ९ बाद ३४४ धावा केल्या होत्या. कुसल मेंडीस (१२२) आणि समरविक्रमा (१०८) या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने उभारलेले हे दमदार आव्हान पाकिस्तान संघाला पेलवेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती. त्यातच इमाम उल हक आणि कर्णधार बाबर आझम सुरूवातीलाच स्वस्तात तंबुत परतल्यामुळे या सामन्यात एकवेळ पाकिस्तानची अवस्था बिकट झाली होती.
परंतु, नंतर अब्दुला शफीक याने १०३ चेंडूत केलेल्या ११३ धावा आणि मोहम्मद रिझवानच्या १२१ चेंडूतील १३१ धांवामुळे या अटीतटीच्या सामन्यात ४८.२ षटकातच पाकिस्तानने बाजी मारली आणि २ महत्वपुर्ण गुणांची कमाई केली. ३७ या धावसंख्येवर २ महत्वपुर्ण फलंदाज गमावल्यामुळे पाकिस्तान संघ अडचणीत सापडला होता.परंतु, त्यानंतर सलामीवर अब्दुल्ला शफीक आणि फॉर्मात असलेल्या मोहम्मद रिझवानने भरभक्कम भागीदारी रचल्यामुळे या संघाची तिसरी विकेट पडली तेव्हा २१३ धावा झालेल्या होत्या.
इंग्लडने बांगलादेशचा केला पराभव
दुस-या एका सामन्यात गत विश्वविजेत्या इंग्लडने आज बांग्लादेशला तब्बल १३१ धावांनी पराभूत करून या स्पर्धेतील विजयाचे खाते उघडले. हिमाचल प्रदेश येथील धरमशाला या नयनरम्य मैदानावर झालेला हा सामना अगदीच एकतर्फी झाला. प्रथम फलंदाजी करतांना बेअरस्टो (५२), मॅलन (१४०) आणि रूट (८२) या इंग्लडच्या फलंदाजांनी बांग्लादेशच्या एकाही गोलंदाजाला प्रभावी ठरू दिले नाही आणि या कामगिरीच्या जोरावर इंग्लडने ५० षटकात ९ बाद ३६४ धावा जमविल्या. या धावसंख्येला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेश संघाची सुरूवातच रडतखडत झाली. अवघ्या ४९ धावांवर या संघाचे पहिले चार खंदे फलंदाज पॅव्हेलिअनमध्ये परतले होते. परंतु, सलामीवीर लिटन दास याने केलल्या ७६ धावा आणि त्याला नंतर मुशफिर रहीम आणि तौहीद या दोघांनी थोडी सन्मानजनक फलंदाजी करून साथ दिल्यामुळे बांग्लादेश संघाला ४८.२ षटकात सर्वबाद २२७ अशी माफक धावसंख्या तरी नोंदविता आली.