नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पत्ता विचारण्याचा बहाणा करून तरूणास लुटणा-या टोळक्यातील एकास पोलीसांनी अटक केली आहे. दोन साथीदारांच्या मदतीने तरूणास निर्जनस्थळी घेवून जात ही लुटमार करण्यात आली होती. या घटनेत दुचाकीस्वार टोळक्याने मोबाईलसह खिशातील रोकड असा सुमारे २० हजाराचा ऐवज बळजबरीने काढून घेत पोबारा केला होता.
सुनिल दादासाहेब भंडारी (२८ रा.लालबाग मुंबई, हल्ली मारूती मंदिराजवळ सिन्नर फाटा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. याबाबत देवराज संजय गुणवंत (२० रा.शांतीनाथ हौ.सोसा.आशानगर बिटको पॉईन्ट) या युवकाने फिर्याद दिली होती. गुणवंत शनिवारी (दि.२७) रात्री आपल्या घर परिसरात फेरफटका मारत असतांना ही घटना घडली होती.
एमएच १५ एचएस ६२०१ या अॅक्टीव्हावर आलेल्या त्रिकुटाने त्यास पत्ता विचारण्याचा बहाणा करून नजीकच्या अंधाराच्या ठिकाणी नेले. या ठिकाणी टोळक्याने आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या खिशातील अॅपल कंपनीचा मोबाईल व रोकड असा सुमारे २० हजाराचा ऐवज बळजबरीने काढून घेत पोबारा केला होता. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.