नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगातील सर्वात जुनी संस्कृती असलेल्या सिंधू समाजाच्या प्राचीन परंपरेची महती सर्वांपर्यत पोहोचविण्यासाठी नागपूर येथे लवकरच ‘सिंधू आर्ट गॅलरी’ स्थापन करण्यात येईल.यासाठी जागा निश्चिती करण्यात आली असल्याचे व १४० कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूरीसाठी प्राप्त झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित सिंधी सांस्कृतिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
आमदार कुमार आईलानी, सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुखरामानी, सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर,अकादमीचे सदस्य राजेश बटवानी, मंजु कुंगवानी,तुलसी सेनिया तसेच ॲड. डॉ. दयाराम लालवानी, घनश्याम कुकरेजा, विरेंद्र कुकरेजा आदी यावेळी उपस्थित होते. अनेक शतकाची परंपरा असलेल्या व सनातन संस्कृती जीवीत ठेवणाऱ्या सिंधी समाजाने कष्टाने उद्योग व्यापारात प्रगती केली आहे. फाळणीनंतर या समाजाला येणाऱ्या अडचणीची आपल्याला जाणीव असून त्यांना राज्यात मालकी हक्काचे पट्टे मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री यांनी दिले.
याप्रसंगी आ. कुमार आईलानी, घनश्याम कुकरेजा, महेश सुखरामानी, विरेंद्र कुकरेजा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी सिंधी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक ॲड. डॉ. दयाराम लालवानी यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तद्नंतर ‘वरसो न विसार’ या सिंधी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला सिंधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.