इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीला जोरदार झटके बसत असतांना आता थोडीसी दिलासा देणारी बातमी या आघाडीला मिळाली आहे. पश्चिम बंगालमध्य स्वबळावर लढण्याची घोषणा करणा-या ममता बॅनर्जी काहीशा नरमल्या आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी ममता यांच्यांशी चर्चा केली. तर पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, की जागावाटपाशी संबंधित तृणमूल काँग्रेससोबत काम करून मध्यममार्ग काढला जाईल असे सांगितले.
पश्चिम बंगालमधील जागावाटपावरून वादाच्या केंद्रस्थानी असलेले काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी ममतांच्या नेत्याची माफी मागितली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांना ‘परदेशी’ असे संबोधल्यानंतर काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने शुक्रवारी खेद व्यक्त केल्यानंतर बॅनर्जीनेही ताठर भूमिका सोडली आहे.
अधीर यांनी डेरेक ओ’ब्रायनला कॉल करून त्यांची माफी मागितली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यानेही माफी स्वीकारली आहे. चौधरी म्हणाले, की डेरेक ओब्रायन हा परदेशी आहे, त्याला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. डेरेक ओब्रायन यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा न होण्यासाठी अधीर यांना जबाबदार धरले होते.
डेरेक ओ’ब्रायन यांच्या राष्ट्रीयतेवर प्रश्न उपस्थित केल्यावरून गोंधळ झाला. त्यानंतर त्यांनी माफी मागितली. त्याअगोदर चौधरी हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप ओब्रायन यांनी केला होता. यापूर्वी तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राज्यात लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार असल्याचे जाहीर केले होते. ममतांचे कडवे टीकाकार अधीर रंजन चौधरी त्यांच्यावर भाजपसोबत गुप्त करार असल्याचा आरोप करत आहेत.