इंडिया दर्पण ऑनलाईन सेवा
पाटणाः एकीकडे इंडिया आघाडीला ममात बॅनर्जी व आपने धक्का दिल्यानंतर आता मोठा धक्का मुख्यमंत्री नितीशकुमार देणार असल्याची चर्चा रंगली आहे. ते बिहार विधानसभा पुढच्या २४ तासांत विसर्जित करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत ते सध्या कायदेशीर सल्ला घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केल्यापासून महाआघाडीत खळबळ उडाली आहे. त्यातच नितीश यांनी लालू कुटुंबावर टीका केल्याचे पडसाद उमटत आहेत. लालूंच्या कन्यने नितीशकुमार यांच्यावर टीका केल्यामुळे ती टीका त्यांना चांगलीच झोंबली आहे. त्यामुळे ते धक्कातंत्र वापरून ते विधानसभा बरखास्त करण्याची शक्यता आहे.
बिहार मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज नितीश आणि तेजस्वी यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. नितीश यांनी ज्या प्रकारे लालू कुटुंबावर निशाणा साधला, त्यावरून स्पष्ट संदेश गेला की संयुक्त जनता दल आणि भाजपमध्ये आतून तडजोडी सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यापूर्वीच नितीशकुमार यांच्या भाजपसोबत येण्याचे संकेत दिले होते. संयुक्त जनता दलाचे आमदार राष्ट्रीय जनता दलात जाण्याची भीती नितीशकुमार यांना आहे. त्यामुळे ते विधानसभा बरखास्त करण्याची खेळी करू शकतात.
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल सत्तेत आहेत; परंतु नितीश यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची तेजस्वी यांच्याकडे सोपवावी अशी लालूंची इच्छा आहे. दोन्ही पक्षांत अंतर्गत तणाव वाढत होता. आता नितीश यांना भीती आहे की त्यांचे आमदार फुटून तेजस्वी आणि लालूंचा पक्ष सरकार स्थापन करतील. कदाचित त्यामुळेच ते विधानसभा विसर्जित करण्याचा विचार करत असावे अशी चर्चा आहे.