इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी युक्तीवाद झाल्यानंतर न्यायाधीशांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहे. त्यात मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजवावी, आझाद मैदानात ५ हजार पेक्षा जास्त लोक येवू शकत नाही हे देखील कळवण्यात यावे असे आदेश कोर्टाने दिले. त्याचप्रमाणे रोड ब्लॉक होणार नाही व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घ्यावी असे निर्देश हायकोर्टाने दिले.
जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांच्या अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला पायी निघाले आहेत. त्यांचा पायी मोर्चा आज पुण्यात पोहोचला आहे. ते उद्यापर्यंत मुंबईत पोहणार आहे. त्याअगोदरच कोर्टाने हे निर्देश दिल्यामुळे आता हे आंदोलना कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे.
या सुनावणीच्या वेळी राज्याचे महाधिवक्ता डॉ. रविंद्र सराफ देखील न्यायालयात उपस्थित होते. यावेळी जरांगे यांच्या या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा, सरकारने या मोर्चावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली. महाधिवक्ता सराफ यांनी सरकारकडे आंदोलनासाठी कुठल्याही अधिकृत मागणीचे पत्र आले नाही. त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण शहराच्या महत्त्वाच्या भागात आंदोलन करण्याबाबत पुनर्विचार करण्याची सरकारची भूमिका असल्याचे सांगितले. दोन्ही युक्तीवाद एेकल्यानंतर न्यायाधीशांनी हे निर्देश दिले.