जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव जिल्हयातील माजी खा. डॅा. उल्हास पाटील व त्यांची कन्या डॅा.केतकी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळयामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या खासदार रक्षा खडसे आहे. त्यांना यावेळेस उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या प्रवेश सोहळ्याकडे बघितले जात आहे. या मतदार संघात डॅा. केतकी पाटील यांच्या नावाची अगोदरपासून चर्चा सुरु आहे. त्यामुळे हा प्रवेश सोहळा भाजपला फायद्याचा तर खडसे यांना चेकमेट देणारा आहे.
मुंबईत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी कन्या केतकी पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी डॉ. उल्हास पाटील, केतकी पाटील यांनी आपल्या मनोगतातून भाजपा प्रवेशाची भूमिका विशद केली. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून सर्वांचे भाजपात स्वागत केले. यावेळी युवानेते रोहितदादा निकम, अमोल जावळे, नंदू महाजन यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
डॅा. उल्हास पाटील हे गेले कित्येक वर्षे काँग्रेसमध्ये होते. पण, त्यांनी आता काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्हयातील राजकीय समीकरण सुध्दा बदलणार आहे. या मतदार संघात एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. पण, खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपला या मतदार संघात सक्षम उमेदवार हवा होता. त्यामुळे त्यांनी डॅा. उल्हास पाटील यांच्यासह मुलीला प्रवेश दिला. या लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात लेवा पाटील समाजाचे मते आहे. खडसे व पाटील हे दोघे लेवा पाटील समाजाचे आहे. असे असले तरी डॅा. केतकी पाटील यांना भाजपने उमेदवारी देण्याबाबत कोणतेही आश्वासन दिलेले नाही. दुसरीकडे हा प्रवेश ईडीची कारवाई टाळण्यासाठी झाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. डॅा. पाटीलमुळे उलट खडसे यांना निवडणूक सोपी होईल असेही बोलले जात आहे.