नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– संतप्त प्रियकराने ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून प्रेयसीचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेयसी दुसऱ्या कोणासोबत मोबाइलवरून चॅटिंग करीत असल्याचा राग आल्याने त्याने तीचा खून केला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याने हा खून केला. त्यानंतर प्रियकराने आपल्या मित्राच्या मदतीने मृतदेह अंबड येथून दुचाकीवरून रासबिहारी लिंकरोड येथील मोकळ्या जागेत आणून टाकल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास बेड्या ठोकल्या असून पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी प्रियंका विरजी वसावे (वय १९, मु. पाटवारा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) हिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. त्यांना घटनास्थळवरून एक बंद मोबाइल फोन मिळाला. तो सुरू केल्यानंतर फोन कॉलिंगवरून पोलिसांनी प्रियकरास ताब्यात घेतले. सागर चिवदास तडवी (वय, २१, मूळ राहणार नंदुरबार,हल्ली राहणार, माउलीनगर, अंबड) असे संशयिताचे नाव आहे.
पहिले कडाक्याचे भांडण
प्रियंका औरंगाबाद नाक्यावरील एका नर्सिंग कॉलेजमध्ये परिचारिकेचे प्रशिक्षण घेत होती. प्रियंका व सागर हे दोघे प्रेमात होते. सोमवारी दुपारी प्रियंका अंबड येथे सागरच्या घरी गेली होती. त्यानंतर रात्री १ वाजेच्या सुमारास प्रियंका मोबाइलवर अन्य कोणाशी चॅटिंग करीत असल्याचा संशय सागरला आला. या कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
असा केला खून
भांडणानंतर चॅटिंग केल्याच्या संशयातून संतप्त झालेल्या संशयित सागरने प्रियंकाचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर सागरने मित्राला फोन करून प्रियंकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर मित्रही घरी आला. त्यानंतर दोघांनी दुचाकीवरून प्रियंकाचा मृतदेह अंबड येथून नेला. त्यानंतर उड्डाणपूलमार्गे बळीमंदिर येथून रासबिहारी लिंक रोडवरील मिराद्वार लॉन्सशेजारील मोकळ्या जागेत फेकून दिला.