इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्याः अयोध्यामध्ये राम मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी उसळली होती. पाच लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. एकाच वेळी झालेल्या या गर्दीमुळे काहीसा गोंधळही येथे झाला. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने याची दखल घेतली. त्यानंतर आता अयोध्येत सर्व वाहनांच्या एंन्ट्रीला बंदी घातली आहे.
रामललाच्या दर्शनासाठी सध्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. सध्या अयोध्येतील तापमान सहा अंशांवर आहे; मात्र कडाक्याची थंडी असूनही भाविकांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. सर्वजण राम रंगात रंगले आहेत. रामलल्लाची मूर्ती मंदिरात विराजमान झाल्यानंतर आजपासून भाविकांना दर्शन खुले झाले आहे. रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झालेली आहे.
दर्शन बंदच्या वृत्ताचे पोलिसांनी केले खंडण
मंगळवारी दर्शन बंद करण्यात आल्याचे वृत्त आले होते. पण, या वृत्ताचे अयोध्या पोलिसांनी खंडण केले. त्यांनी सांगितले की काही सोशल मीडियाच्या माध्यमातून अयोध्या जिल्ह्यात अनेक किलोमीटर लांब भाविकांच्या गर्दीमुळे श्री रामलल्लाचे दर्शन तात्पुरते थांबवण्यात आले आहे, अशा खोट्या बातम्या छायाचित्रांसह प्रसारित केल्या जात आहेत. अयोध्या पोलिस या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन करते.
आरतीसाठी पास
आरतीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन मोफत पास घेता येतील. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या वेबसाइटनुसार, वैध सरकारी ओळखपत्र दाखवून ऑफलाइन पास श्री रामजन्मभूमी येथील कॅम्प ऑफिसमधून मिळवता येतो.