बारामती (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- माळेगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना नव्यानेच व देशात पहिल्यांदाच साकारण्यात आली आहे. पोमॅटो ही नवीन संकल्पना यशस्वीपणे राबवून, टोमॅटोच्या झाडाला कलम करून बटाट्याचे पीक घेण्यात आले. या माध्यमातून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार असून उत्पन्नात वाढ होणार आहे.
पोमॅटो म्हणजे बटाटा आणि टोमॅटो यांचा संकर. एकाच पिकामध्ये एकाच पाण्यामध्ये दोन पिके घेण्याचा हा अफलातून प्रयोग आहे. त्यात बटाट्याचे खोड आणि त्याला टोमॅटोचे कृत्रिम कलम लावण्यात आले आहे. त्यात जमिनीच्या वरच्या बाजूला टोमॅटो लागतात, तर जमिनीच्या खालच्या बाजूला बटाटे लागतात. पोटॅटो आणि टोमॅटोचे पीक एकच घेण्यात आल्याने त्याला पोमॅटो असे नाव दिले जाते.
दुसरा प्रयोग आहे ब्रिमँटोचा. वांग्याला इंग्लिश मध्ये ब्रिंजल असे म्हणतात. म्हणूनच एकाच खोडावर एक फांदी वांग्याची आणि दुसरी फांदी टोमॅटोची म्हणून याला ब्रिमँटो असे नाव देण्यात आले आहे. बारामतीतील या प्रयोगामध्ये एका बाजूला वांगी तर दुसऱ्या बाजूला टोमॅटो लागलेले आहेत. ठराविक पाण्याच्या वापरातून आणि त्याच खताच्या मात्रेतून एकाच वेळी एकाच जागेवर दोन पिके उत्पादने मिळाली, तर ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहेत. कमी जागेमध्ये अधिक उत्पादनाचा प्रयोग शेतकऱ्यांना यशस्वी करावाच लागणार आहे.