इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळयाची जय्यत तयारी सुरू आहे. या वातावरणाचा व्यापारी जगतालाही मोठा फायदा होत आहे. ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ या किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या संघटनेने राम मंदिर उद्घाटनामुळे देशभरातील व्यापाऱ्यांना एक लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय झाला आहे.
‘कॅट’ च्या म्हणण्यानुसार, राम मंदिरामुळे गेल्या काही दिवसांत व्यापाऱ्यांनी एक लाख कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे. व्यापारी मंडळी ही मोहीम राबवत आहेत. ‘कॅट’ने सांगितले, की व्यापारी समुदायामध्ये ‘हर शहर अयोध्या-घर घर अयोध्या’ ही राष्ट्रीय मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दिल्ली आणि देशातील सर्व राज्यांतील व्यापारी संघटनांनी २२ जानेवारी रोजी आपापल्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. हे सर्व कार्यक्रम बाजारपेठेतच होतील, त्यामुळेच उद्या दिल्लीसह देशातील सर्व बाजारपेठा खुल्या राहतील आणि व्यापारी सर्वसामान्यांसोबत श्री राम मंदिराचा उत्सव साजरा करतील.
‘कॅट’चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले, की सोमवारी दिल्लीत २ हजारांहून अधिक छोटे-मोठे कार्यक्रम होणार आहेत. देशभरात ३० हजारांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांनी दावा केला – या शतकातील हा सर्वात मोठा दिवस असेल, जेव्हा एकाच दिवशी अनेक कार्यक्रम होतील. त्यांनी सांगितले की, आज घरे, बाजार, मंदिरे आणि इतर ठिकाणे सजवण्यासाठी फुलांची मागणी खूप वाढली आहे. मातीचे दिवे विकत घेण्यासठी लोकांचाही ओघ कायम आहे. मिठाईच्या दुकानांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. लोक प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करत आहेत. बाजारात राम झेंडे आणि राम फलकांचा तुटवडा आहे.