नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना आजाराशी झगडण्याची दिशा आणि खंबीर पाठबळ देण्यासाठी एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालयात विशेष पॅलिएटिव्ह केअर सुरू करण्यात आले आहे. ‘राहत’ असे या पॅलिएटिव्ह केअर सेंटरचे नाव आहे. एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटल व मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या पॅलिएटिव्ह केअर सेंटरचे येत्या शुक्रवारी (दि १३) ऑक्टोंबर रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे.
कॅन्सर, पक्षाघात, एचआव्ही/एडस ,औषधाने न बरा होणारे क्षयरोग, मतिमंद मुले, वृध्दपकाळाने अपंगत्व आलेले किडनी विकार, लिव्हर विकारग्रस्त असे दुर्धर आजार असलेले रुग्ण आजारातून पूर्णपणे बरे हो ऊ शकत नाही, त्यांचे शारीरिक त्रासाबरोबर ,मानसिक स्वास्थ्य बिघडते, अशा धक्याने अनेक नातेवाईक खचून जातात. या धक्क्यातून सावरून आपल्या रुग्णाची काळजी घ्यायला एसएमबीटीच्या पॅलिएटिव्ह केअरमध्ये मदत केली जाणार आहे.
या पॅलिएटिव्ह केअर सेंटरमध्ये डॉक्टरांसह परिचारिका, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रुग्णाच्या वेदना कमी केल्या जाणार आहेत. समुपदेशकांकडून रुग्णाचे समुपदेशन केले जाईल. यासोबत रुग्णाला आजाराशी झगडण्याची शारीरिक आणि मानसिक तयारी याठिकाणी केली जाणार आहे. रुग्णांचा आहार आणि व्यायामाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आहारतज्ज्ञ आणि फिजिओथेरपी सेवा उपलब्ध आहेत.
दिर्घ काळ असणारे व शारिरीक अपंगत्व आणणा-या व्याधी खूप त्रासदायक असतात. शारिरीक समस्यांच्या सोबतच सामाजिक, भावनिक, आर्थिक आणि अध्यात्मिक त्रासांनादेखील अनेक रुग्णांना आजारपणात सामोरे जावे लागते. यावेळी त्यांना पॅलिएटिव्ह केअर उपयुक्त ठरते. अनेक डॉक्टर पॅलिएटिव्ह केअरचा सल्ला कॅन्सर, पक्षाघात, एचआव्ही/एडस औषधाने न बरे होणारे क्षयरोग, मतिमंद मुले, वृध्दपकाळाने अपंगत्व आलेले किडनी विकार, लिव्हर विकारग्रस्त इ. रुग्णांना देतात. एसएमबीटीच्या डॉ. गौरी कुलकर्णी पॅलिएटिव्ह केअर या विषयातील तज्ञ आहेत. यासोबतच डॉ विनया वाघ यांच्यासह अनेक तज्ञ याठिकाणी पूर्णवेळ उपलब्ध असणार आहेत.
‘पॅलिएटिव्ह केअर’चा उद्देश
- रूग्णांना होणारा त्रास आणि वेदनांपासून आराम देणे.
- वैद्यकिय तज्ञांच्या मदतीने रूग्णांचा उपचार करणे.
- रूग्ण आणि त्याच्या कुटुंबियांना आजार आणि त्यासंबधी रूग्णाची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करणे.
- रूग्ण आणि त्याच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून दिलासा देणे.
सुसज्ज पॅलिएटिव्ह केअर युनिट
दीर्घकालीन यकृत किंवा किडनी आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण,कॅन्सरच्या उपचारांना प्रतिसाद देन देणारे रुग्ण त्यावेळी डॉक्टर त्यांना पॅलिएटिव्ह केअरचा सल्ला देतात. याठिकाणी रुग्णांना होणाऱ्या असह्य वेदनांवर वेदनाशामक किंवा उपशामक उपचार पद्धतीने दिलासा दिला जातो. एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये सुसज्ज पॅलिएटिव्ह केअर युनिट उभारण्यात आले असून अनेक रुग्ण याठिकाणी दाखल करण्यात येत आहेत.
डॉ. प्रदीप भाबड, वैद्यकीय अधीक्षक, एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटल
अनुभवी कर्मचारी वर्ग
टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत एसएमबीटी करारबद्ध झाल्यानंतर एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटलमधील स्टाफ याठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आला होता. मुंबईसारख्या ठिकाणी पॅलिएटिव्ह केअर युनिट कशापद्धतीने काम करतात याचा प्रत्यक्ष अनुभव या स्टाफने घेतला असून यातील अनेक बारीक सारीक गोष्टी त्यांच्याकडून आत्मसात करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील उत्तम दर्जाचे पॅलिएटिव्ह केअर युनिट एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये साकारण्यात आले आहे.
विशेष सीएमईचे आयोजन
‘पॅलिएटिव्ह केअर’ सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी पॅलिएटिव्ह केअर संकल्पना अधिक दृढ व्हावी यासाठी विशेष तज्ञांच्या उपस्थितीत सीएमईचे आयोजन करण्यात आले आहे. यात डॉ. गौरी कुलकर्णी, टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या पॅलिएटिव्ह कन्सलटंट डॉ. जयिता देवधर, डॉ. रघु थोटा व डॉ. रूप गुरसहानी यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी न्युरो पॅलिएटिव्ह केअर, एंड ऑफ लाईफ केअर, संभाषण कौशल्य व ठळक परंतु वाईट बातमी अशा विषयांवर मंथन करण्यात येणार आहे.