मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे २२ जानेवारीला नाशिकला काळाराम मंदिरात दर्शन घेणार असून त्यानंतर गोदाकाठी ते महाआरती करणार असल्याची माहिती त्यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली. अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होणार असून त्या दिवशी ते अयोध्याला नाही तर नाशिकला येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त ते शिवाजी पार्क येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सपत्निक आले होते. यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, २३ जानेवारीला हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. यावर्षी २३ जानेवारीला शिवसेनेचे शिबीर होणार आहे. त्याच दिवशी नाशिकमध्ये गोल्फक्लबच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
यावेळी ते म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिराचा सोहळा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. हा अभिमानाचा अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे. या सोहळयात कोणताही राजकीय रंग येऊ नये. राम आमचा आहे. आम्ही केव्हाही अयोध्येला जाऊ शकतो. असेही त्यांनी स्पष्ट केले.