नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, वेगवेगळया भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुली नुकत्याच बेपत्ता झाल्या आहेत. त्यांना कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून याप्रकरणी सरकारवाडा व इंदिरानगर पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कॅनडा कॉर्नर परिसरातील शरणपूर लिंकरोड भागात राहणारी अल्पवयीन मुलगी मंगळवार (दि.२) पासून बेपत्ता आहे. सायंकाळी ती घरात कुणासही काही एक न सांगता निघून गेली असून तिला कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज बांधला जात आहे. याबाबत पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरणार करीत आहेत.
दुसरी घटना इंदिरानगर येथे घडली. वडाळा पाथर्डी मार्गावरील गुरू गोविंदसिंग कॉलेजच्या प्रवेशद्वार परिसरातून मुलगी बेपत्ता झाली. तिलाही कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज पालकांनी वर्तविला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार पारणकर करीत आहेत.