नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वंजारवाडी भागात अल्पवयीन मुलीशी मैत्री करून एकाने बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोस्को आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदिनाथ शरद शिंदे (२१ रा.वंजारवाडी) असे संशयित तरूणाचे नाव आहे. याबाबत पीडीत मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केली आहे. शिंदे व पीडिता एकमेकांचे मित्र मैत्रीण असून त्यातून ही घटना घडली. मुलगी अनुसूचित जाती जमाती संवर्गातील असून, मंगळवारी (दि.२) संशयिताने मुलीस आपल्या घरी नेले.
या ठिकाणी कोणी नसल्याची संधी साधत त्याने बळजबरीने बलात्कार केला. घरी येवून मुलीने आपल्या कुटुंबियाकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक सहाय्यक आयुक्त आनंदा वाघ करीत आहेत.