नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क हटवणे नाफेड व एनसीसीएफचा कांदा बंद करणे आणि नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनकडून जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद ठेवले आहे याबाबत पुढील रणनीती ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची सोमवार २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे यांनी दिली. या बैठकीला संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या बैठकाली जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
एकीकडे व्यापा-यांनी संप पुकारलेला असतांना आता कांदा उत्पादक शेतक-यांची बैठक होत असून त्यात काय निर्णय होतो हे महत्त्वाचे आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून संप पुकारल्याने जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समिती बंद आहे. येवला येथे जिल्ह्यातील सर्व कांदा व्यापाऱ्यांची बैठकीत हा संप कायम ठेवण्याचा निर्णय झाला.
त्याचबरोबर २६ तारखेला पणनचे अधिकारी व मंत्र्यांबरोबर मागण्यांसाठी होणाऱ्या बैठकीत जर समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर राज्यातील सर्व व्यापारी बंद मध्ये सामील होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. ४० टक्के निर्यात मूल्य रद्द करावे ही शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे केंद्राने तातडीने हा निर्णय घ्यावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी केली.