इंडिया दर्पण वृत्तसेवा
जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बैठक झाली. या बैठकीत १४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्याचा निर्णय झाला. त्याचबरोबर साखळी उपोषण करणारे मनोज पाटील जरांगे पाटील हे महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका बैठकी दरम्यान घेण्यात आली.
कालच मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील सरकार पुन्हा माझे आंदोलन मोडण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप केला होता. सरकारकडून आता हा शेवटचा डाव टाकण्याची शक्यता असून, त्यांचा डाव मी यशस्वी होऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. सरकारला ३० दिवसांचा वेळ दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेतल्यावर मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी गावात उपोषणा स्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, अंतरवाली सराटी येथे गोदाकाठावरील १४३ गावातील मराठा समाज बांधवांचा मेळावा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला. या नियोजन मेळाव्याला मोठया प्रमाणात नागरीकांची उपस्थिती होती.
मराठा आरक्षणाकरीता अंतरवाली सराटी येथे आमरण व साखळी उपोषण होत आहे. शासनाने तीस दिवसाची मुदत मागीतली ती मुदत देवून आमरण उपोषण थांबवले. आता साखळी उपोषण करण्यात येत आहे. शासनाला दिलेली मुदत १४ आक्टोंबर रोजी संपत आहे. त्यामुळे अंतरवाली सराटी परीसरात भव्य दिव्य सभेचे नियोजन करण्यात येणार आहे. या करीता जागेची पाहणी करण्यात येत आहे. सोबतच यासाठी आपण राज्याचा दौरा करणार असल्याचे देखील जरांगे यांनी म्हटले आहे.