नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाणी पिण्याच्या बहाण्याने इंदिरानगर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या चोरटयास अटक करण्यात शहर पोलीसाना यश आले आहे. गेली दहा दिवस तो पोलीसाना गुंगारा देत होता. जालना जिल्ह्य़ातील एका गावात तो लपून बसला होता. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली.
गेल्या सोमवारी (दिं. १८) ही घटना घडली होती, इंदिरानगर घरफोडी चोरीच्या गुन्हयातील आरोपी विशाल ज्ञानेश्वर तिनबोटे वय २० वर्ष, रा. म्हसोबा मंदीराजवळ, साठेनगर, वडाळागाव, नाशिक यास गुन्हेशाखायुनिट २ यांनी ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करीता इंदिरानगर पोलीस ठाणे येथे हजर केले होते. त्याप्रमाणे संबधीत तपासी अंमलदार हे त्याचे अटकेची कारवाई करीत असताना त्याने पाणी प्यायचे आहे असे सांगीतले. तपासी अंमलदार हे त्यास पाणी पिण्याकरीता पोलीस ठाण्यातील पाण्याचे कुलरचे येथे घेवून गेले असता त्याने नजर चुकवून तेथील भिंतीवरून उडी मारून पलायन केले होते. यानंतर तपासी अंमलदार यांनी दिलेल्या तक्रारी वरून त्याचे विरूध्द इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
या आरोपीचा गुन्हेशाखा, युनिट-२ कडून शोध सुरू असताना पोलिस हवालदार परमेश्वर दराडे यांना सदरचा आरोपी हा जालना येथे पळून गेला असल्याची खात्रीशिर गोपनिय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक रणजित नलवडे यांना कळविली असता त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदेश पाडवी, पोलिस हवालदार परमेश्वर दराडे, सुनिल आहेर यांनी मु. पो. उक्कडगाव, ता. घनसांगवी, जि. जालना येथे जावून स्थानीक पोलीसांचे मदतीने शोध घेतला असता सदरचा आरोपी हा तेथील गोदावरी नदीपात्रा जवळ असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेण्यााकरीता पथक गेले असता तो नदीपात्रात पळुन जाऊ लागला. यावेळी पोलीस पथकाने त्याचा नदी पात्रात पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. हा सर्व थरार येथील नागरिकांनी बघितला. आता त्याला पुढील कार्यवाही करीता इंदिरानगर पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.