नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र शासनाने निर्यात बंदीची घोषणा केल्याने जिल्हयाताली कांदा व्यापाऱ्यांनी चांदवड येथे बैठक घेऊन बाजार समितीमध्ये कांदा लिलाव हे बेमुदत बंद ठेवले आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यात लिलाव बंद असले तरी देखील लासलगावची उपबाजार समितीच्या विंचूर येथे कांदा लिलाव सुरू आहे. या ठिकाणी देखील कांद्याच्या भावात जवळपास दीड ते दोन हजाराची घसरण बघण्यास मिळाली. सर्वत्र बाजार समिती बंद असल्याने विंचूर ही एकच बाजार समिती चालू असल्याने शेतकऱ्यांना या ठिकाणी कांदा विक्रीस आणले.
विंचूर बाजार समितीमध्ये कांदा लिलावाला सुरुवात झाल्यानंतर कांद्याला सरासरी २००० ते २२०० रुपये बाजार भाव मिळाला आहे. एकीकडे नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितीत कांदा लिलाव बंद असताना देखील विंचूर बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र निर्यात बंदी अगोदर ज्या कांद्याला ४ हजार रुपये भाव मिळत होता तोच आता २ ते २२०० रुपये भाव मिळत असल्याने अक्षरशः दीड ते दोन हजाराची घसरण यावेळी बघण्यास मिळत आहे.
कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने पुन्हा घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. त्यामुळे शनिवारपासून पासून जिल्ह्यातील सर्व कांदा लिलाव बेमुद बंद राहणार आहे. चांदवड येथे झालेल्या कांदा व्यापारी असोशियशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
काल चांदवडला पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
शुक्रवारी केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले. सकाळपासून लासलगावसह जिल्ह्यातील विविध भागात कांदा लिलाव ठप्प झाले आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले, चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर एक तासा पेक्षा जास्त वेळ रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला.
हे आहे कारण
कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला होता. ३१ डिसेंबर पर्यंत एमइपी ८०० डॉलर प्रति टन ठेवण्यात आले होते. मात्र ८ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा वाणिज्य विभागाने नोटिफिकेशन काढून कांद्यावर निर्यात बंदी लादली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे.
असे घसरले भाव
केंद्र सरकारने शुक्रवारी कांद्याची निर्यात बंदीची अधिसूचना काढल्यामुळे सकाळी सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात १५०० ते २००० रुपयांची घसरण झाल्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार निषेध केला आहे.