नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने कनिष्ठ अभियंता या पदासाठीची परीक्षा ही एकूण ९ परीक्षा केंद्रावर दोन सत्रात सुरळीत पार पडली. कनिष्ठ अभियंता (इवद व ग्रापापू) या पदासाठी १२६४ परीक्षार्थी पैकी ८७१ परीक्षार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते, तर ३९३ परिक्षार्थी गैरहजर होते.
ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद पदभरतीतील विविध पदांसाठी नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा ही घेण्यात येत आहे. त्यानुषंगाने कनिष्ठ अभियंता या पदासाठी दि. १७ व २० नोव्हेंबर रोजी परीक्षा ही घेण्यात आली. परीक्षार्थींची संख्या जास्त असल्याने १७ रोजी तीन सत्रात व २० रोजी दोन सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
१७ व २० रोजी पार पडलेल्या परीक्षेची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व परीक्षा केंद्रांवर उपस्थित अधिकारी यांच्याकडून परीक्षा सुरळीत सुरू असल्याबाबतची माहिती घेतली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी देखील सर्व परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. आता २३ रोजी वरिष्ठ सहायक या पदासाठी परीक्षा होणार आहे.