नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -राज्य शासनाने मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जातप्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबत न्यायमुर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीस कागदपत्रे सादर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध पुरावे 21 ते 24 नोव्हेंबर, 2023 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
राज्य शासनाने 7 सप्टेंबर, 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जातप्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबत न्यायमुर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली असून या समितीस कागदपत्रे, पुरावे याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व कार्यालय प्रमुख व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मराठा-कुणबी नोंदी शोधण्यााठी 4 नोव्हेंबर 2023 पासून विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित आलेला आहे.
न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील समिती यांचा विभाग व जिल्हानिहाय दौरा कार्यक्रम जाहिर झाला असून या समितीमार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचा 2 डिसेंबर 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे आढावा घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील नागरीकांकडून त्यांच्याकडील 1967 पूर्वीचे शासकीय पुरावे असणारे अभिलेखे, उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इ. जुनी अभिलेखे उपलब्ध असल्यास त्यांच्याकडील पुरावे व कागदपत्रे 21 ते 24 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विशेष कक्षात स्वीकारली जाणार आहेत. तरी जिल्ह्यातील नागरीकांनी त्यांच्याकडील पुरावे व कागदपत्रे विहीत वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.