नाशिक – जिल्ह्यातील दिंडोरी येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ केंद्र( दिंडोरी प्रणित ) आणि त्यांच्या शेकडो तथाकथित अध्यात्मिक केंद्रात अनेक निरर्थक, कालबाह्य, कर्मकांडांमधून सामान्य श्रद्धाळू सेवेकरी यांचे होणारे प्रचंड आर्थिक व विविध प्रकारचे शोषण याबद्दल सखोल चौकशी करणे कामे तज्ज्ञांची समिती नेमून, दोषींवर जादूटोणाविरुद्ध कायद्यासह, इतर प्रचलित कायद्यान्वये कडक कायदेशीर कारवाई करणे बाबत महाराष्ट्र अंनिसच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना नाशिक जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनातम्हटले आहे की, अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ विश्वस्त मंडळाच्या कार्यकारी सदस्याला आक्षेपार्ह चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देत, वीस कोटींच्या खंडणीची मागणी करत आजवर तब्बल एक कोटी पाच लाख उकळणाऱ्या संशयित महिलेला व तिच्या मुलाला प्रत्यक्ष दहा लाखाची खंडणी स्वीकारताना नाशिक शहर पोलिसांनी अटक केल्याची बातमी काल अनेक प्रमुख वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेली आहे.
विशेष म्हणजे तक्रारदार हे स्वामी समर्थ गुरुपीठ विश्वस्त मंडळाचे कार्यरत सदस्य आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयित महिला ह्या कृषी विभागात अधिकारी असून, त्या स्वामी समर्थ केंद्रात उपासिका आहेत. स्वामी समर्थांच्या ४५ केंद्राच्या त्या व्यवस्थापिका म्हणून काम पाहतात, असेही बातमीत म्हटलेले आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी,’संकल्प सिद्धी,’ ह्या अध्यात्मातील गोंडस नावाने कंपनीची स्थापना करून , या कंपनीत महिलेने अनेक सेवेकऱ्यांकडून पैसे उकळल्याचे उघड झाले आहे, असेही बातमीत नमूद आहे.
धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली अखिल भारतीय स्वामी समर्थ केंद्र व गुरुपीठ यामध्ये हा प्रकार मागील दहा वर्षापासून जर घडत आहे तर, या तथाकथित आध्यात्मिक केंद्राच्या प्रमुखांना हे प्रकरण माहीत नाही, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. दुसरे असे की खंडणी देणारे आणि मागणारे संशयित हे सर्व सदर स्वामी समर्थ केंद्राचे विश्वस्त सदस्य शाखांचे , केंद्राचे व्यवस्थापक आहेत, ते कुणी सामान्य भक्त, सेवेकरी नाहीत. ही बाब आपण प्रामुख्याने लक्षात घ्यावी. याचाच अर्थ मागील अनेक वर्षांपासून सातत्याने सामान्य श्रद्धाळू, भक्त,भाविक, सेवेकरी यांना अध्यात्माच्या नावाने फसवून करून, त्यांचे कोट्यवधी रुपयाचे शोषण केले जाते, हे या घटनेवरून उघड आणि स्पष्ट झाले आहे.
सेवेकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मलिदा तर लाटला जातोच आहे. शिवाय धर्माच्या, अध्यात्माच्या नावाने सेवेकऱ्यांच्या भावना, श्रद्धा यांच्याशी जीवघेणा खेळ रोज खेळला जातो. ह्याला संपूर्णपणे या केंद्राचे प्रमुखच जबाबदार आहेत, असे महाराष्ट्रअंनिसचे ठाम मत आहे. म्हणून या खंडणी प्रकरणाला श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख यांना जबाबदार धरून, त्यांना ताब्यात घ्यावे. धर्म आणि अध्यात्माच्या नावाने चालणाऱ्या त्यांच्या सर्व व्यवहारांची, सर्व प्रकारची, सर्वांगाने चौकशी करावी, दोषी आढळल्यास त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायदा तसेच प्रचलित कायद्यांन्वये कडक कारवाई करावी ,अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना जिल्हा अधिकारी नाशिक यांच्या मार्फत पाठवायच्या निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ.टी .आर. गोराणे, राज्य सदस्य राजेंद्र फेगडे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. शामसुंदर झळके, बुवाबाजी विरोधी संघर्ष जिल्हा सचिव महेंद्र दातरंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ReplyForward |